
अमेरिकेने इराणवर गुरुवारी रात्री मोठे हल्ले केले. त्यामुळे इराण युद्ध पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असताना एक दिलासादायक घडामोड घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता कराराची घोषणा केली. या करारानंतर इस्रायलचे सैन्य गाझामधून माघारी येणार असून गाझामधील सशस्त्र गट शस्त्रास्त्रs खाली ठेवतील.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. त्यावेळी इराणसोबतच्या युद्धासंदर्भात ट्रम्प यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. मात्र, गाझातील संघर्ष थांबवण्याबाबत ट्रम्प यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर आज व्हाईट हाऊसमधून एक निवेदन जारी करण्यात आले. इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या शांतता मंडळाने ऐतिहासिक कराराची घोषणा केली. हमाससह गाझातील सर्व सशस्त्र गट शस्त्रास्त्रs खाली ठेवतील, असा दावा या करारात करण्यात आला आहे. हमासकडूनदेखील इस्रायलबरोबरचा हा संघर्ष संपवण्यासाठी करार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तीन देशांची मध्यस्थी
हमाससोबत चर्चा करण्यासाठी कतार, तुर्की आणि इजिप्त या देशांनी मध्यस्थी केली. त्यानंतर हमासने या करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवली. मात्र, शस्त्रे खाली ठेवण्याचा मुद्दा अडसर ठरत होता. पण आता हमास आपली शस्त्रे ‘आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दला’कडे सोपवण्यास सहमत झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
इराणविरोधात लष्करी कारवाई रोखण्याचा ठराव एका मताने पडला
इराणविरोधात लष्करी कारवाई रोखण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत अवघ्या एका मताने पडला. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर लष्करी कारवाई करण्यासाठी संसदेची मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. ट्रम्प यांना असे अधिकार मिळल्यामुळे जगाची डोकेदुखी वाढणार आहे.

























































