
भिवंडीच्या नारपोलीतील ‘कोहिनूर’ अपार्टमेंट ही चार मजली अतिधोकादायक इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून दहा रहिवाशांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजल्यानंतर घडली. अत्यंत अरुंद रस्त्यात असलेल्या कोहिनूर इमारतीशेजारील एक बैठी चाळ जेसीबीने भुईसपाट केल्यानंतरच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहचू शकले. मध्यरात्री एक वाजल्यापासून सुरू असलेले बचाव कार्य आज सायंकाळी 5 वाजता संपले. गेल्या पाच वर्षांत भिवंडीत इमारत दुर्घटनेत 60 हून अधिक बळी गेले असून या घटनेने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नारपोलीतील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत 2013 मध्ये उभारण्यात आली होती. या इमारतीत दोन विंग असून प्रत्येक विंगमध्ये 24 या प्रमाणे 48 फ्लॅट आहेत. परंतु बिल्डरने अत्यंत तकलादू बांधकाम केल्याने ही इमारत आधी महापालिकेने धोकादायक व नंतर अतिधोकादायक घो-षत केली होती. ही इमारत रिकामी करण्यासाठी तीन वेळा नोटिसही बजावण्यात आली होती.
सामान आणण्यासाठी इमारतीत गेले आणि…
अनेकांना अरविंद घोगरे यांनी इमारतीबाहेर काढले. परंतु त्यांचा डोळा चुकवून काहीजण इमारतीत राहिलेले सामान आणण्यासाठी पुन्हा वर गेले आणि घात झाला. अवघ्या काही सेकंदात इमारत कोसळली आणि त्यात दहा जणांचे बळी गेले. एनडीआरएफ, अग्नीशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. सकाळी 8 वाजता पहिला मृतदेह हाती लागला आणि सायंकाळी 4 वाजता शामजी पाल या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर आणखी कोणी बेपत्ता आहे का? याची खातरजमा एनडीआरएफच्या जवानांनी केली आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता बचावकार्य थांबवल्याची माहिती मंडळ अधिकारी शैलेश भोजने यांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
राज्याचे आपत्कालीन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. इमारत दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगतानाच त्यांनी शासनाच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
वॉर्ड ऑफिसरमुळे वाचले अनेकांचे प्राण
इमारतीला तडे गेल्याचे कळताच प्रभाग क्र. 4चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे, सहकारी कर्मचारी सुमीत जाधव रात्री दहा वाजता घटनास्थळी आले. त्यांनी स्वतः चारही मजल्यांवर जात सर्व कुटुंबियांना घराबाहेर पडण्यास सांगितले. काहीजण बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा त्यांना अक्षरशः खेचून इमारतीबाहेर पाठवण्यात आले. घोगरे इमारतीबाहेर आले आणि अवघ्या दहा मिनिटात कोहिनूर इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले.
कंत्राटदारावर फौजदारी कारवाई
कोहिनूर इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. 25 लोकांना तिथून हलवण्यातही आले होते. पण पंत्राटदाराने तशाही परिस्थितीत काम सुरू ठेवले होते. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अनेकदा रहिवासी अशा इमारतीतून बाहेर पडायला तयार नसतात. पण शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा असतो. त्यामुळे धोकादायक इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढताना सक्ती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तडे गेलेल्या पिलरला प्लास्टर करतानाच…
इमारतीच्या पिलरला तडे गेले होते. गुरुवारी सायंकाळी स्थापत्य अभियंत्याचा सल्ला न घेता कंत्राटदाराकडून या इमारतीच्या तळ मजल्यावरील तीन पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आणि त्यानंतर इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली. रात्री 8 वाजता इमारत झुकत असल्याचे कळताच नगरसेवक यशवंत टावरे यांनी पालिकेला कळवले.
मृतांची नावे
क्रिश कुमार (25), रणजीत सिंग (45), राधेश्याम कुशवाह (45), मिराज शेख (34), संतोष पांडे (42), शमीम अन्सारी (30), राकेश पासवान (45), मुकेश पासवान (35), अशोक पासवान (50), श्यामजी पाल.
जखमींची नावे
अभय यादव (26), दीपक यादव (25), संगीता प्रजापती (36)

























































