चढावा चोर… गद्दी छोड! संसदेसमोर घोषणा घुमल्या, श्रीराम मंदिरातील देणगी चोरीवरून विरोधकांचे पथनाट्य आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘नीट’ पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला जेरीस आणले आहे. संसदेत एकीकडे सरकारची कोंडी करण्यात येत असताना संसदेच्या बाहेर आज विरोधी पक्षांनी देणगीचोरीचे नाटय़ रूपांतर करून सरकारविरोधात एक आगळेवेगळे आंदोलन केले. अपक्ष खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे पुजाऱ्याच्या वेशात दानपेटी घेऊन आले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी त्यात दान टाकले आणि नंतर त्या दानपेटय़ा घेऊन पप्पू यादव यांनी पलायन केले, मात्र त्यांना खासदारांनी पकडले.

संसदेच्या आवारात करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या या पथनाट्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार सहभागी झाले. या नाटय़ातून देणगी चोरीवर टीका करण्यात आली. पप्पू यादव हे पुजाऱयाच्या वेशात खाली बसतात. समोर तीन दानपेटय़ा ठेवतात. राहुल गांधी एका बाजूने येतात आणि दानपेटीत दान टाकतात. त्यापाठोपाठ इतर खासदारदेखील दान टाकतात. थोडय़ा वेळात पप्पू यादव दानपेटय़ा उचलून पलायन करतात. मात्र, खासदार त्यांना पकडतात आणि या नाटय़ाचा समारोप होतो. त्यानंतर विरोधी खासदारांनी जोरदार नारेबाजी केली. ‘देणगीचोर गद्दी छोड’च्या घोषणांनी संसदेचा परिसर दणाणून गेला. यावेळी काही खासदारांच्या हातात ‘अमित शहा संसदेतून गायब का?’ असा फलक घेऊन उभे होते. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराबाबत अमित शहा यांना उत्तर द्यावे लागेल. अन्यथा त्यांना तत्काळ गृहमंत्रीपदावरून बरखास्त करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड, प्रणीती शिंदे, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार उपस्थित होते.