
इथेनॉल मिश्रित ई-20 पेट्रोलच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाने शुक्रवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये राष्ट्रीय टाऊन हॉलमध्ये एका बैठकीचे आयोजन केले. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत ई-20 संदर्भात तीन प्रमुख मागण्या मांडल्या. केजरीवाल म्हणाले की, नागरिकांवर ई-20 इंधन जबरदस्तीने लादले जात आहे. वाहनधारकांना ई-20 आणि शुद्ध पेट्रोल यापैकी निवडीचा अधिकार मिळायला हवा. तसेच, ई-20 मध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असल्याने त्याची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असताना देशात पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 रुपयांपेक्षा कमी असायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.
पेट्रोल पंपांवर ई-20 आणि शुद्ध पेट्रोल दोन्ही उपलब्ध करून ग्राहकांना निवडीचा पर्याय द्यावा. त्याचबरोबरीने ई-20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी ठेवावी. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा देत पेट्रोलचे दर कमी करावेत अशा तीन मागण्या त्यांनी केल्या. केजरीवाल यावेळी म्हणाले, ई-20 मुळे वाहनांचे मायलेज कमी होते, इंजिनवर परिणाम होतो, ग्राहकांचा खर्च वाढतो आणि शेतकऱ्यांनाही अपेक्षित लाभ मिळत नाही. इथेनॉल प्रकल्पांमुळे काही भागांत भूजल प्रदूषणाचा धोका असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
सरकार दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करून नागरिकांवर ई-20 लादत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला, जर इथेनॉल इतके फायदेशीर असेल, तर शुद्ध पेट्रोलचा पर्याय का दिला जात नाही? केजरीवाल यांनी असा दावाही केला की सरकार इथेनॉल धोरण राबवण्यामागे काही छुपा अजेंडा असू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या चौकशीतून हे धोरण अमेरिकेच्या दबावाखाली राबवले जात असल्याचे संकेत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.



























































