
तब्बल 92 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रपुल क्रीडा स्पर्धेतील ज्युडोमध्ये हिंदुस्थानने अखेर सुवर्ण इतिहास घडवला. अस्मिता डेने महिलांच्या 48 किलो तर हर्ष सिंहने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात आपल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकत केवळ विजयच मिळवला नाही, तर हिंदुस्थानच्या ज्युडोला नवे सुवर्णपर्व सुरू करून दिले. हिंदुस्थानच्या यामिनी मौर्यला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
1934 मध्ये राष्ट्रपुल स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतल्यानंतर ज्युडोमध्ये सुवर्णपदकाची प्रतीक्षा कायम होती. अखेर हा प्रदीर्घ दुष्काळ अस्मिता आणि हर्ष यांनी संपवला. या दोन सुवर्णपदकांनी हिंदुस्थानच्या क्रीडा इतिहासात नवे सोनेरी पान लिहिले गेले आणि सुवर्ण पदकाचा उदय झाला.
महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अस्मिता डेने पॅनडाच्या हायडी क्वाचची कडवी झुंज मोडीत काढली. नियोजित वेळेत दोघींनाही गुण मिळाले नाहीत. सामना अतिरिक्त वेळेत गेला आणि गोल्डन स्कोअर नियमानुसार जो पहिला गुण मिळवेल तो विजेता ठरणार होता. अस्मिताने शांतचित्ताने संधी साधत निर्णायक गुण मिळवला आणि हिंदुस्थानच्या गळ्यात ऐतिहासिक सुवर्णपदक घातले. अवघ्या पाच मिनिटांनी पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात हर्ष सिंहने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झवर 10-0 अशी एकतर्फी मात केली आणि दुसरे सोने जिंकले. या विजयासह राष्ट्रपुल स्पर्धेतील ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो हिंदुस्थानचा पहिला पुरुष खेळाडू ठरला.
या दोन सुवर्णपदकांमुळे हिंदुस्थानच्या पदकतालिकेतील स्थानातही मोठी सुधारणा झाली आहे. हिंदुस्थानच्या खात्यात आता 5 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी एपूण 19 पदके जमा झाली असून संघाने पदकतालिकेत आठवे स्थान गाठले आहे. तसेच ज्युडामध्ये हिंदुस्थानची सुवर्णमोहीम अद्याप संपलेली नसून महिलांच्या 57 किलो वजनी गटात यामिनी मौर्यला अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रीती पवार बॉक्सिंगच्या अंतिम फेरीत
जागतिक क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर असलेल्या प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडाकेबाज विजय मिळवला. प्रीतीने झांबियाच्या पॅथरीन म्वापेचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन वेळा आशियाई चॅम्पियन ठरलेली प्रीती आता सुवर्णपदकाच्या लढतीत पॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोचा सामना करणार आहे.
तेजस्विनची थाळीफेकमध्ये सर्वोत्तम कामगिरी
डेपॅथलॉनच्या थाळीफेकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून तेजस्विन शंकरने पदकांच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आहे. शंकरने 39.66 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि 658 गुण मिळवून पदकाच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले. गुडघ्याच्या दुखापतीनंतरही त्याची सातत्यपूर्ण कामगिरी काwतुकास्पद आहे.
अंपुश पांघल फायनलमध्ये दाखल
हिंदुस्थानी युवा बॉक्सर अंपुश पांघलने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात 5-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पॅनडाच्या जोशुआ ओपह्रीवर मुष्टियुद्धाचा वर्षाव करून पांघलने आपले किमान रौप्य पदक निश्चित केले होते.
रोहितचाही विजय
रोहित मजगुल ज्युडोच्या 66 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. रोहित आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा इतका पुढे होता की, हर्ष सिंगप्रमाणेच त्यालाही इप्पॉनने (वेळेआधीच) विजेता घोषित करण्यात आले. श्रद्धा चोप्राही महिलांच्या 52 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.
रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानची नोंद
हिंदुस्थानी संघाने मिश्र 4×400 मीटर रिले स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. भारतीय खेळाडू विशाल टिक्के, राजेश रमेश, रुषदीप काwर, अन्सा बाबू आणि नीरू पाठक यांनी 3ः20ः98 मिनिटांत ही कामगिरी केली. त्यामुळे आता अंतिम फेरीत ते कशी कामगिरी करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.





























































