
केंद्राच्या वादग्रस्त E20 इंधन धोरणात बदल करण्यासाठी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आता आक्रमक झाले आहेत. येत्या 4 ऑगस्ट रोजी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. तसेच नागरिकांनी स्वाक्षरी केलेली याचिका यावेळी सादर करणार आहेत. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे E20 इंधनावरील एका टाऊन हॉल सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या संभाषणादरम्यान सरकारसमोर जनतेच्या वतीने तीन मुख्य मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये ग्राहकांना पेट्रोल पंपावर रेग्युलर पेट्रोल आणि ई-20 इंधन यापैकी कोणतेही एक निवडण्याचा पर्याय असावा, पेट्रोलचे दर सध्याच्या 84 रुपये प्रति लिटरवरून कमी करण्यात यावेत आणि इथेनॉलची किंमत कमी करावी. तसेच, ई-20 मिश्रित पेट्रोलच्या दरात आणि एकूणच पेट्रोलच्या दरातही कपात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इथेनॉलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत केजरीवाल यांनी ई-20 मुळे वाहनांना हानी पोहोचत नाही, असा दावा करण्यासाठी सरकारने सादर केलेला अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी केली. ते म्हणाले, “केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, अभ्यास करण्यात आला असून ई-20 मुळे वाहनांना हानी पोहोचत नाही. त्यांनी तो अहवाल सार्वजनिक करावा, जेणेकरून सत्य समोर येईल.” या टाऊन हॉल कार्यक्रमात विविध राज्यांतील लोकांनी सहभाग घेतला होता.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, या मुद्द्यावर ऑनलाइन माध्यमातून दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या सह्यांची पिटीशन गोळा करण्यात आली असून येत्या 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मी स्वतः या सर्व याचिकांचे प्रिन्टआउट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर जाणार आहे. या मोर्चासाठी प्रत्येकाने येण्याची गरज नसून ज्यांना पोलिसांच्या लाठ्या आणि तुरुंगाची भीती वाटणार नाही अशा सुमारे 100 लोकांना सोबत घेऊन लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्याला टॅग करून लिहून पाठवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, मंत्र्यांनी जनतेची ही बाजू ऐकून घ्यावी आणि आपल्या मंत्रिमंडळात यावर चर्चा करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.




























































