मोखाडावासीयांना मिळणार नवीन सबस्टेशन; शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरण ताळ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोखाड्यात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या मंगळवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे महावितरण कंपनीचे प्रशासन सुतासारखे सरळ झाले. विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी नवीन सबस्टेशन तयार करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. हे नवीन सबस्टेशन येत्या डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांची एकच पळापळ उडाली. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विशेष बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीला तालुकाप्रमुख दिलीप बांडे, तालुका उपसंघटक दत्ताभाऊ शिंदे, विभागप्रमुख मनोज कदम, ज्येष्ठ शिवसैनिक बळवंत मिस्त्री, माजी तालुकाप्रमुख रवींद्र कटिंलकर, उपशहरप्रमुख प्रकाश आरडे, प्रवीण काळे, जितेंद्र काळे, सरपंच मुरलीधर कडू, प्रमोद टेमसे, उमाकांत हमरे, किशोर बांडे, खोडाळा विभागाचे शाखा अभियंता किरण अहिरे, उप कार्यकारी अभियंता राजेश शिवगण यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारींचे निवारण येत्या दहा दिवसांत करण्याचे आश्वासन यावेळी उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण यांनी दिले. तसेच नवीन सबस्टेशन तातडीने उभे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन जोडणीसाठी यापूर्वी दीड हजार रुपये घेतले जात होते. मात्र आता ही रक्कम तीन हजार ७०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यावर रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर वाढीव घेतलेली रक्कम परत करण्याचेही आश्वासन यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.