
कफ सिरप जप्त
भाईंदर : मीरा रोड येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित खोकल्याच्या कफ सिरपचा साठा बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. नासीर शेर खान, शादाब रफिक खान आणि इलियास दिनमोहम्मद शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे ९३ हजार ५०० रुपये किमतीच्या कफ सिरपच्या २७बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नागरगोजे करीत आहेत.
सर्व्हिस सेंटरचे नुकसान
ठाणे : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावरकरनगर परिसरात मंगळवारी दुपारी नाल्यालगतची भिंत आणि मोठे झाड नाल्यात कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन सर्व्हिस सेंटरचे नुकसान झाले आहे. वागळे इस्टेट शिवाजी वाडी, कामगार नाका येथे दुपारी ३.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
रिक्षा पलटी
पनवेल : कारची घडक लागून रिक्षा पलटी झाल्याची घटना पनवेल रोडवरील पुष्पक नगर परिसरात घडली. या अपघातात रिक्षाचालक आणि एक प्रवासी जखमी झाला. अपघाताप्रकरणी कार चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई येथे राहणारे रिक्षाचालक फिरोज शेख हे प्रवाशांना घेऊन पनवेलच्या दिशेने जात होते. रिक्षा पुष्पकनगरजवळ आली असता भरधाव कारने रिक्षाला धडक दिली.





























































