भातसा धरणाखालील गावांना ‘जागते रहो’; साजिवली, सरलांबे, कासगाव, तुते, कवडासला पुराचा अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठ दिवसांपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने भातसा धारण ९५ टक्के भरले असून प्रकल्पाचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होणार असल्याने भातसा नदी काठच्या साजिवली, सरलांबे, कासगाव, तुते, कवडास तसेच अन्य गावांना पुराचा अलर्ट जारी केला आहे. भातसा प्रशासनाने तसे पत्रच दिल्याने या सर्व गावांमध्ये जागते रहोचे आवाहन केले जात आहे.

 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा धरण ९५ टक्के भरले आहे. मागील अनेक दिवसांपासून पालघर व ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील धरणे जवळपास भरली आहेत. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूरमधील मोडकसागर, तानसा व भातसा तहसीलदारांना पाठवले पत्र या धरणांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने चांगलीच वाढ झाली आहे. भातसा धरणाची पातळी १४२.०७ मीटर असून सद्यस्थितीत धरण १३५.८४ मीटरने भरले आहे. अजून काही दिवस असाच पाऊस राहिल्यास धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने धरण क्षेत्रातील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे पत्र धरणाचे कार्यकारी अभियंता संदीप भालेराव यांनी तहसीलदारांना दिले आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने सापगाव पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच साजिवली, सरलांबे, कासगाव, तुते, कवडास, सापगाव, बामणे, खुटघर, अंदाड यांसारख्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे.