झुरळं एकत्र आल्यास सगळं काही उलथवून टाकतात…पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांना ‘कॉक्रोच’ची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानात प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य व्यक्तींचे जीणे अवघड झाले आहे. सामान्य लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे मुश्कील झाले आहे. पाकिस्तानातील जनतेला महागाईच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने तेथील जनता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना तरुण म्हणा किंवा झुरळ म्हणा. मात्र जर ते एकत्र आले तर ते सर्व काही उलथवून टापू शकतात, अशी भीती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी व्यक्त केली आहे.

जर व्यवस्था सुधारली नाही, तर हे ‘कॉक्रोच’ सर्व काही उलथवून टाकतील, असे मोहसीन नक्वी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता ‘कॉक्रोच’ची पाकिस्तानमध्येही दहशत निर्माण झाली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हिंदुस्थानात मागील काही महिन्यांपासून ‘कॉक्रोच’ची मोठी चर्चा सुरू आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना करत विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. आता याच धर्तीवर पाकिस्तानातदेखील एक ऑनलाईन चळवळ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारलाही आता तरुणांच्या आंदोलनाची भीती सतावत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना भीती व्यक्त करत आपल्याच सरकारला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. ़

 पाकिस्तानवर असलेल्या कर्जाचा आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नसल्याचा मुद्दादेखील नक्वी यांनी मांडला. नक्वी यांनी तरुणांमधील वाढत्या असंतोषाचा मुद्दा प्रामुख्याने अधोरेखित करताना ‘कॉक्रोच’ शब्दाचा उच्चार केला.
 आपल्या तरुणांना जे हवं ते आपण त्यांना देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना तरुण म्हणा, ‘कॉक्रोच’ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण जर हेच ‘कॉक्रोच’ एकत्र आले, तर ते सर्व काही उलथवून टापू शकतात. आपण ज्या व्यवस्थेत आहोत, ती कोलमडली आहे. तुम्ही ते मान्य करा किंवा करू नका, पण गेल्या 70 वर्षांपासून आपण ही व्यवस्था कशीतरी ओढत नेण्याचा प्रयत्न करत आहोत.