
‘नीट’ पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्याथ्यांच्या कुटुंबांना मदत देण्यासाठी सरकारने नियम, अटी-राती पुढे केल्या आहेत. नियम सगळे जनतेसाठी आहेत, पण अर्ध्या रात्री सरकार पाडण्यासाठी, आमदार, खासदार खरेदी करण्यासाठी ५०-५० कोटींच्या बॅगा भरल्या जातात, तेव्हा हे नियम कुठे जातात? असा जळजळीत सवाल कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी भाजप आणि मिंध्यांच्या ‘खरेदी-विक्री’ राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. आत्महत्या केलेल्या ‘नीट’च्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना १ कोटी रुपये मदत देण्यात यावी, ही जंतरमंतरवरील आंदोलनाची मागणी मोदी सरकारने मान्य केली. मात्र आता सरकारने नियम, अटी पुढे करून मदत देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यावर अभिजित दिपके यांनी कडक शब्दांत टीका केली. “सरकारने दिलेला शब्द पाळावा. नियम हे फक्त लोकांसाठीच आहेत का? आमदार, खासदारांची फोडाफोडी करताना कोट्यवधींचा व्यवहार केला जातो, सरकारे पाडण्यासाठी वारेमाप पैसा उधळला जातो, तेव्हा हे नियम कुठे जातात?”, असा स्पष्ट सवाल दिपके यांनी केला
पोलिसांवरही गुन्हे दाखल करा
जंतरमंतरवरील आंदोलनात भाजपने गुंड घुसवले होते, या गुंडांनीच पोलिसांना तसेच विद्यार्थ्यांना मारहाण केली, या आरोपाचा अभिजीत दिपके यांनी पुनरुच्चार केला. संसद भवनावर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. शेकडो विद्यार्थ्यांची डोकी फोडली. पेलेट गनचाही वापर करण्यात आला. अंगावरचे कपडे फाटेपर्यंत मुलींना मारण्यात आले. लहान मुलांवरही काठ्या चालवण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर करताना पोलिसांना लाज वाटली नाही का? असा सवाल करून विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दिपके यांनी केली.
तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा चमकदार
दोन्ही सभागृहात पेपरफुटीविरोधातील विधेयक मंजूर झाल्यानंतर रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ जारी करून यासंदर्भातील माहिती दिली. त्यावर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी ‘तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. केवळ कायदा करून पेपरफुटी थांबणार नाही, तर त्यासाठी सरकारचे धोरण अधिक स्पष्ट असले पाहिजे, असेही ते म्हणाले.






























































