
राजधानी दिल्लीमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनुपस्थित आहेत. यावरून विरोधक टीका करत असताना मोदी गेल्या चार-पाच दिवसांपासून रोज रात्री एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून संवाद साधत आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस टीका केली आहे.
संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फेसबुक नेता आहेत अशी टीका करणारेच आज इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत. जनतेशी फेस बुक वरून संवाद साधत आहेत. फेसबुकवरून सरकार चालवत आहेत. मोदी सरकार फेस बुक सरकार. कालाय तस्मै नमः!”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मा.उद्धवजींना ते फेसबुक नेता आहेत अशी टिका करणारेच आज इंस्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत,
फेस बुक वरून जनतेशी संवाद साधत आहेत!
मोदी सरकार फेस बुक सरकार !
कालाय तस्मेय नमः @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4India @narendramodi https://t.co/R9Jo8kcoxa— Sanjay Raut (@rautsanjay61) August 1, 2026
शुक्रवारी मोदींनी आणखी एक व्हिडीओ अपलोड करून जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो असे म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही. तुम्हाला ही अवदसा आठवली कुठे? हे भ्रमिष्ट झालेले आहेत. देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान मनाने, विचाराने भरकटले आहेत. त्यांनी सल्लागार बदलायला पाहिजे. पक्षांतर्गत ज्या बंडाळ्यांच्या गोष्टी येत आहेत, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बरी नाही.
माफ करताय, मग मुलांचे चारित्र्य कशाला तपासताय? खरे म्हणजे तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. आपण कुणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात, कुणाला तरी 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणाला होता. तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही विसरताय. कुणी तुमच्या आई-बहिणीवर गेलेले नाही. भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चाललेला आहे आणि त्याला झुंडशाही, हुकुमशाही म्हणतात. त्या हुकुमशाहीविरुद्ध पोरं रस्त्यावर आली. याच मुलांच्या मदतीने तुम्ही 2014 साली सत्तेवर आले होतात. हे विसरू नका. कुणी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार लोकांकडून आदर, प्रेम आणि शिव्या मिळत असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तुम्ही आमचा पक्ष फोडलात. तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अमित शहा आणि मोदींनी तोडला तेव्हा आम्हाला काय दु:ख झाले नाही का? तुम्ही निर्लज्जपणे बाळासाहेबांचा पक्ष फोडला. त्यामुळे या शिव्या काहीच नाही. महाराष्ट्राची जनता तुम्हाला रोज शिव्या घालत आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो – मोदी






























































