
दिल्लीतील जंतरमंतरवर येथे गेल्या महिन्यात तरुणांचे वादळ धडकले होते. पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणी राजधानीत रस्त्यावर उतरले होते. हे लोण देशभरात पसरले होते. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना खुर्ची सोडावी लागली. या आंदोलनामध्ये ‘जेन झी’ पिढी रस्त्यावर उतरली आणि सरकारला धडकी भरवली.
दिल्लीतील आंदोलनात तरुणांची प्रचंड क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली. तरुणांनी सरकारला प्रश्न विचारले, घोषणाबाजी केली आणि वेगवेगळ्या रिल बनवून डिवचलेही. इंटरनेट आणि सोशल मीडियावर मुरलेल्या या पिढीतील एक तरुण प्रचंड फेमस झाला असून त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 2 हजारांहून 8 लाखांवर पोहोचली आहे. अभिनव बिश्त असे या तरुणाचे नाव आहे.
अभिनव बिश्त हा बीसीएचे शिक्षण घेत असून गेल्या चार वर्षांपासून कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतोय. दिल्लीत झालेल्या आंदोलनात तो देखील सहभागी झाला होता. तत्पूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 2400 च्या आसपास फॉलोअर्स होते. मात्र सीजेपी आंदोलनात व्हिडीओ बनवायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. काही व्हिडीओंना तर लाखो व्ह्यूज मिळाले. याचा फायदा त्याला झाली आणि आज त्याच्या फॉलोअर्सची संख्या 8 लाख 69 हजारांवर पोहोचली आहे.
issac1rl या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनवने सांगितले की, माझे व्हिडीओ व्हायरल होतील याची मला काही कल्पना नव्हती. मी कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी झालो नव्हतो. मला तिथले वातावरण अनुभवायचे होते आणि रिल कंटेंट बनवायचा होता. सीजेपी आंदोलनाशी निगडित व्हिडीओ, पोलिसांसोबतचे संवाद आणि जेन झी स्टाईल बनवलेला कंटेंट सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लाखो लोकांनी तो पाहिला, शेअर केला.
दरम्यान, अभिनवचे खाते काही काळासाठी सस्पेंडही करणअयात आले होते. त्यामुळे मी खुप अस्वस्थ झालो होतो. नेमकी तक्रार काय होती हे मला समजू शकले नाही. परंतु आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाते पूर्ववत झाले. विशेष म्हणजे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला लोकांचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे फोन वारंवार हँग होऊ लागला. आता आयफोन घेतला असून त्यावर चांगल्या क्वालिटीचा व्हिडीओ कंटेंट बनवेल, असेही तो म्हणाला.



























































