
जुलै महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. या दोन टप्प्यांतील पावसामुळे जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जनावरेही दगावली. जिल्ह्यातील १५८०२ घरांमध्ये पाणी शिरून संसाराचा अक्षरशः चिखल झाला. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात सुमारे १८० कोटी रुपयांच्या नुकसानीची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे डहाणू, तलासरी आणि पालघर या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागांमध्ये शेती, घरे, सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल, कृषी, ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण होताच संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मुसळधार पावसामुळे सार्वजनिक मालमत्ता, घरे, वीज व्यवस्था, रस्ते तसेच नागरिकांच्या संसाराचे मिळून सुमारे १८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक नुकसान झाले असून अनेक रस्ते, पूल, साकव आणि संपर्क मार्ग वाहून गेले आहेत. दुर्गम गाव-पाड्यांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शाळा, अंगणवाड्या, संरक्षण भिंती यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात महावितरणचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मृतांच्या वारसांना चार लाखांची मदत
अतिवृष्टीत दगावलेल्या १५ मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये याप्रमाणे आर्थिक मदत वितरित करण्यात आली असून नुकसानग्रस्त ९३६५ कुटुंबांना प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे मदत वितरित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, आपत्ती व्यवस्थापनाचे विवेकानंद कदम उपस्थित होते.
विशेष पॅकेज मिळणार
पूरग्रस्त पालघर जिल्ह्यासाठी विशेष मदत पॅकेज मिळवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष पॅकेजचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मिळणाऱ्या निधीतून पूरप्रतिबंधक उपाययोजना आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.




























































