
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा अनेक गावांना फटका बसला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी जुन्या पुलावर चढून गावाकडे आल्याने बुधवारच्या मध्यरात्रीपासून भामरागडसह अनेक गावांचा इतर भागाशी संपर्प तुटलेला आहे. दरम्यान, पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरल्याने 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
विशेष म्हणजे भामरागड, सिरोंचासह शेकडो गावांचा वीज पुरवठा 24 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून खंडित झाला. सिरोंचा मार्गावर आज पहाटे वीज पुरवठा सुरू झाला. मात्र भामरागड लाइनचा वीज पुरवठा खंडितच आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. पर्लकोटाचा पूर रात्रीपासून ओसरणे सुरू आहे, पण आज सकाळपर्यंत पुलावरून पाणी वाहात असल्यामुळे वाहतूक ठप्पच आहे. दरम्यान, चिमूर तालुक्यात वीज पडून सुहास जयेंद्र काळ (21) या शेतकऱयाचा मृत्यू झाला.





























































