लपून छपून स्मार्ट मीटर बसवण्याचा डाव शिवसैनिकांनी उधळला; ठाण्याच्या महागिरी कोळीवाड्यातील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुस्थितीत असलेले विद्युत मीटर बदलून त्याठिकाणी लपून छपून स्मार्ट मीटर बसवण्याचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथे राहणाऱ्या ८५ वर्षीय मालतीबाई पवार यांनी विजेचे बिल भरले नाही म्हणून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज मीटर कापून नेले. मात्र वीज बिल भरल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी जुना मीटर न लावता त्याजागी स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घातला. परंतु शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी स्थानिकांसह हा डाव उधळून लावला.

अन्यथा आंदोलन करू

ठाणे उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला. मूळ मीटर जोडून त्वरित वीज सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. याची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता शरद पवार, उपकार्यकारी अभियंता राजेश मसणे यांनी त्वरित मूळ मीटर लावले व त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.

यावेळी विभागप्रमुख संजय भोई, उपविभागप्रमुख गणेश मुणगेकर, अजय पवार, शाखाप्रमुख प्रदीप घोसाळकर, परेश कांबळे, आनंद मानकामे समीर नाईक, चेतन मुणगेकर, कृतिक पाटील व नागरिक उपस्थित होते.