स्पायडर-मॅनची बॉक्स ऑफिसवर विक्रमी झेप! दुसऱ्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्व्हलचा बहुप्रतिक्षित ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ भारतीय बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत अनेक हॉलिवूड चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. टॉम हॉलंडच्या स्पायडर-मॅन मालिकेतील चौथ्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 60.60 कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशीही दमदार घोडदौड कायम ठेवत 49.35 कोटी रुपयांची भर घातली. त्यामुळे दोन दिवसांतील एकूण कमाई 109.95 कोटींवर पोहोचली आहे.

 

दुसऱ्या दिवसाच्या कमाईत इंग्रजी आवृत्तीने 28 कोटी रुपये, हिंदीने 17 कोटी रुपये, तर तमिळने 2.25 कोटी, तेलुगूने 2 कोटी, मल्याळमने 0.07 कोटी आणि कन्नडने 0.03 कोटी रुपये कमावले.

 

दोन दिवसांतच 109.95 कोटी रुपयांचा टप्पा गाठत ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ ने हिंदुस्थानातील अनेक लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. यामध्ये ‘मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग’, ‘गॉडझिला x काँग: द न्यू एम्पायर’, ‘फास्ट एक्स’, ‘एफ१’, ‘थॉर: लव्ह अँड थंडर’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’, ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’, ‘द फेट ऑफ द फ्युरियस’, ‘स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम’, ‘ऑब्लिव्हियन’ आणि ‘कॅप्टन मार्व्हल’ यांचा समावेश आहे. हा चित्रपट हिंदुस्थानातील 16 वा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. स्पायडर-मॅनच्या या विक्रमी कामगिरीमुळे येत्या काही दिवसांत चित्रपट आणखी मोठे बॉक्स ऑफिस विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.