भरवशाच्या नीरज आणि लव्हलिनाकडून अपेक्षाभंग; राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानची भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला नीरज चोप्रा आणि बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनकडून सुवर्णपदकांची अपेक्षा होती; पण नीरज आणि लव्हलिना या दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानच्या अन्य बॉक्सर्सनी मात्र कमाल करत सुवर्णपदकांचा धडाका लावला. त्यामुळे शनिवारी हिंदुस्थानने पदकतालिकेत मोठी झेप घेत चौथे स्थान गाठले.

हिंदुस्थानी भालाफेकपटूंनी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदुस्थानला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी, ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने 85.83 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह रौप्यपदक पटकावले, तर पदार्पणातच यशवीर सिंगने 85.41 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या भालाफेकीत हिंदुस्थानने प्रथमच एकाचवेळी दोन पदके जिंकली हे विशेष.

या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिराजेने 89.75 मीटरची दमदार फेक करत सुवर्णपदक पटकावले. मात्र, हिंदुस्थानसाठी खरा अभिमानाचा क्षण ठरला तो नीरज आणि यशवीरच्या दुहेरी यशाचा. विशेष म्हणजे, मोठा दावेदार मानला गेलेला पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम अव्वल स्पर्धकांमध्येही टिकू शकला नाही.

नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 85.83 मीटरची सर्वोत्तम फेक नोंदवली. अखेरचा प्रयत्न फाऊल ठरला तरी सुरुवातीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने रौप्यपदक निश्चित केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील त्याच्या दुसऱया सहभागात मिळवलेले हे आणखी एक मोठे यश ठरले. या स्पर्धेतील सर्वात मोठा धक्का म्हणजे यशवीर सिंगची कामगिरी. 24 वर्षीय यशवीरने सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात 85.41 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम फेक करत कांस्यपदकावर झडप घातली. त्याने स्वतःचाच 83.72 मीटरचा विक्रम मोडला आणि अँडरसन पीटर्स तसेच अर्शद नदीमसारख्या नामांकित खेळाडूंना मागे टाकत सर्वांनाच अचंबित केले.

पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना यशवीर म्हणाला, ‘सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पाच प्रयत्नांनंतरही गोष्टी जुळून येत नव्हत्या. मात्र, तरीही कांस्यपदक जिंकता येईल असा विश्वास होता. त्यामुळे अखेरच्या प्रयत्नात सर्वस्व पणाला लावले आणि त्याचेच पदकात रूपांतर झाले. हे यश माझ्या कुटुंबीयांचे आणि प्रशिक्षकांचे आहे.

जादुमानीला रौप्यपदकावर समाधान

हिंदुस्थानच्या जादुमानी सिंगला पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील बॉक्सिंगच्या अंतिम सामन्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जय डिक्सनशी झाला. अंतिम फेरीत जादुमानीने आपली सुवर्णपदकाची आशा जिवंत ठेवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि सातत्याने आक्रमक ठोसे मारले. सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये दोन्ही बॉक्सर्समध्ये एक भीषण लढत पाहायला मिळाली. जादुमानीने जोरदार ठोशांचा वर्षाव करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे अनेक ठोसे लक्ष्य चुकले. अखेरीस, पंचांनी एकमताने जय डिक्सनला विजेता घोषित केले.