बुलेटस्वार तरुणाला थारने चिरडले; 14 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्णा-नांदेड रोडवरील गौर शिवारात बुलेटवरून जाणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला विनानंबरच्या थार वाहनाने पाठीमागून जोरदार धडक देऊन बुलेटसह फरफटत नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी एक संशयिताला पाठलाग करून ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून कट रचून हत्या केल्याच्या आरोपावरून १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव संतोष बालाजी सावळे (वय २८, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता संतोष सावळे हे त्यांच्या बुलेटवरून पूर्णाच्या दिशेने जात होते. त्यावेळी पूर्णा-नांदेड मार्गावरील नॉव्हेल्टी बार अँड रेस्टॉरंट परिसरात काळ्या रंगाच्या विनानंबरच्या थार वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर संतोष हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. नागरिकांनी त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावळी चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल चंद्रमुनी हानवते हे त्या मार्गाने जात असताना त्यांनी संशयित थारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनातील दोघे वाहन सोडून पळून गेले. त्यापैकी सुधीर पारवे याचा पाठलाग करून हानवते यांनी त्याला ताब्यात घेतले.

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी संतोष सावळे यांचा गावातील काही तरुणांशी वाद झाला होता. या प्रकरणातील गुन्ह्याचा राग मनात धरून कट रचत वाहनाने चिरडून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून चुडावा पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भरधाव कारची दुचाकीला धडक

जिंतूर तालुक्यातील बामणी येथे शुक्रवारी सकाळी भरधाव कारने एका दुचाकीला धडक देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर कारमधील गटविकास अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी किरकोळ अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कोलपा येथे चौकशीसाठी जात असलेले गटविकास अधिकारी आर. एस. इडोळे आणि त्यांच्यासोबत असलेले एक ग्रामसेवक शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता बामणीमार्गे प्रवास करत होते. बसस्थानकाजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. याचवेळी समोरून दुचाकीवर येत असलेले राहुल डाखुरे यांनी प्रसंगावधान राखून वाहन बाजूला घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर भरधाव कार पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आदळली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील गटविकास अधिकाऱ्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. काही नागरिकांनी संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला असला, तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी किरकोळ अपघाताची नोंद करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या अपघातात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा बामणी परिसरात सुरू आहे.