
इराणचे वाढते हल्ले पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता, परंतु आता ट्रम्प यांनी इराणवरील हा नियोजित हल्ला स्थगित करत असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. सोशल मीडिया साईट ‘ट्रूथ सोशल’ वर पोस्ट शेअर करत अमेरिकेने इराणवर सध्या कोणतीही लष्करी कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही न पाहिलेल्या लष्करी सामर्थ्यासह आणि क्षमतेसह अमेरिका इराणविरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार आणि सुसज्ज होती. मात्र, इराण आणि आखाती देशांसह मध्य-पूर्वेकडील इतर देशांनी हा हल्ला टाळण्यासाठी तीव्र आग्रह धरला, कारण एका नवीन आराखडा करारावर सहमती दर्शवण्यात आली आहे. या कराराच्या अंतर्गत होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ, पूर्णपणे आणि सुरक्षितपणे खुली करणे तसेच इराणचा आण्विक धोका कायमचा नष्ट करणे यांचा समावेश असणार आहे. संबंधित देशांच्या विनंतीचा मान राखत, जगाच्या भविष्यातील हितासाठी आणि एका यशस्वी व समृद्ध इराणच्या अस्तित्वासाठी आपण हा हल्ला रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. मात्र, लवकरच या करारावर ठोस तोडगा निघणे आवश्यक असून, या वचनबद्धतेमध्ये इस्रायल देखील आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी मिळून यावर काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत, जोपर्यंत इराण प्रतिकार करत राहील, तोपर्यंत अमेरिका मोठ्या ताकदीने हल्ले सुरूच ठेवेल, असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना इराणनेही अमेरिकेला पाठिंबा देणारे देश युद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळून निघू शकतात, असा इशारा दिला होता. मात्र आता ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेमुळे तूर्तास तणाव काहीसा निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































