
‘रब्ब से है दुआ’ आणि ‘अपोल्लेना’ सारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांमध्ये पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा हिच्या वैवाहिक आयुष्यात सध्या जोरदार वादळ आले आहे. पती अभिनीत विद्यानंद कौशिक आणि त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधात तिने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचार व छळाची गंभीर तक्रार नोंदवली आहे. 31 जुलै रोजी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
जून 2021 मध्ये एका ऑनलाईन अभिनय वर्गादरम्यान अदिती आणि अभिनीत भेटले होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचा विवाह झाला. दोघांनी अगदीच गुपचूपपणे लग्नाचा बार उडवून दिला होता. विशेष म्हणजे लग्नाआधी सप्टेंबर 2024 पासून ते गोरेगाव पश्चिम येथील एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होते.
लग्नानंतर काही कालावधीतच पतीचा खरा चेहरा समोर आला. कपड्यांवरून टोमणे मारणे, किरकोळ कारणांवरून वाद घालणे आणि घराच्या खर्चासाठी स्वतः पैसे देण्याऐवजी उलट माझ्याकडूनच पैसे उकळणे असे प्रकार सुरू झाले, असे अदितीने पोलीस तक्रारीत नमूद केले.
1 जानेवारी 2025 रोजी केवळ एका कॉफीवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला. पतीने अदितीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि तिला सतत टोमणे मारणे आणि मोबाईल फोन तपासणे असा नको त्या गोष्टींचा ससेमिरा पाठीमागे लावला. एवढेच अदितीला तिच्या माहेरच्या मंडळींशी आणि पालकांशी बोलण्यापासूनही रोखले जात होते.
सासू उर्मिला कौशिक यांनी अदितीचे लग्नातील मौल्यवान दागिने काढून घेतले. सासूने सोन्याचे दागिने, हिऱ्याची अंगठी, मंगळसूत्र आणि बांगड्या बळकावून स्वतःकडे ठेवून घेतले. वारंवार मागणी करूनही हे दागिने परत करण्यास नकार दिला गेला. पतीच्या या वागण्यात सासू आणि नणंद कीर्ती कौशिक यांनीही त्याला खतपाणी घातले आणि अदितीचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला. सध्या गोरेगाव पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून अदितीचा पती आणि त्याच्या कुटुंबियांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

























































