
गंभीर संकटाच्या वेळी प्राण वाचवण्यासाठी प्रसंगावधान, धैर्य आणि योग्य मदत महत्त्वाची असते. अशा कठीण प्रसंगात स्वतःला न घाबरता योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. त्यासाठी कोणत्या मोठ्या पदव्यांची किंवा पदकांचीही गरज नसते. आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरादरम्यान याचीच प्रचिती आली आहे. कोणत्याही प्रकारचे अधिकृत प्रशिक्षण नसताना आणि साधी मोटरबोटही उपलब्ध नसताना अवघ्या 25 वर्षांच्या श्रावण कुमार या तरुणाने आपल्या प्राणाची बाजी लावून तब्बल 2000 लोकांचे प्राण वाचवले आहेत.
शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा उप-विभागातील बिहुबोर येथे राहणाऱ्या श्रावण कुमारने दहावीतच शाळा सोडलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात दिक्षू नदीच्या पात्रात वाहून येणारी लाकडे गोळा करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. 19 जुलैच्या पहाटे जेव्हा तो नदीकाठी गेला तेव्हा पाण्याच्या प्रचंड वेगाने आणि वाहून येणाऱ्या मोठमोठ्या झाडांच्या दांडक्यांवरून त्याने पुराचा धोका ओळखला.
सकाळ होताच संपूर्ण परिसर जलमय झाला. स्वतःच्या घरात पाणी शिरल्याची जाणीव असतानाही श्रावणने स्वतःच्या घरापेक्षा इतरांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले. अनुभवी नावाडीसुद्धा ज्या उफाळलेल्या पात्रात उतरण्यास घाबरत होते, तिथे श्रावणने आपल्या मित्रांच्या मदतीने स्थानिक लाकडी होडी पाण्यात उतरवली. कोणतीही मोटरबोट नसताना, फक्त वल्ह्यांच्या मदतीने त्यांनी हे बचावकार्य सुरू केले.
छतावर, पोटमाळ्यावर आणि पाण्याच्या वेढ्यात अडकलेले वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला आणि आजारी रुग्णांना त्यांनी बाहेर काढले. विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे घनघोर अंधारात, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात आणि तरंगणाऱ्या लाकडांच्या धोक्यात त्यांनी सलग दोन दिवस-रात्र अभियान राबवून पाच गावांतील सुमारे 2000 जणांना सुरक्षितस्थळी पोहोचवले. मी जर स्वतःचे घर वाचवायला गेलो असतो, तर तिथे इतरांना वाचवायला कोणीच उरले नसते, असे भावूक उद्गार श्रावणने काढले. ‘एनडीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
आसाममध्ये भीषण परिस्थिती
आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 1 लाख 78 हजार नागरिक प्रभावित झालहे आहेत. चराईदेव, शिवसागर, गोलाघाट, बजानी, धेमाजी, शोणितपूर आणि जोरहाट हे सात जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका चराईदेव आणि शिवसागर या दोन जिल्ह्यांना बसला असून येथील जवळपास 1 लाख 20 हजार नागरीक बाधित झाले आहेत. सध्याच्या घडीला 44 मदत छावण्यांमध्ये 15 हजार नागरिकांसाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली 17 वाटप केंद्राद्वारे 5500 हून अधिक लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात आली आहे. या पुरात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवसागर येथील दिक्षू नदी आणि गोलाघाट येथील धनसिरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचे धोकाय कायम आहे.

























































