अमेरिकेतील आयडाहोमध्ये गोळीबार; हल्लेखोरासह तिघे जण ठार तर दोन गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील आयडाहो राज्यातील ट्विन फॉल्स येथे एका फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत हल्लेखोरासह किमान तीन जण ठार झाले असून, इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. ट्विन फॉल्स शहरातील प्रसिद्ध ‘इन-एन-आउट बर्गर’ रेस्टॉरंटमध्ये एका हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरू केला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी नागरिक सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच ट्विन फॉल्स पोलीस विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

ट्विन फॉल्स शहराचे अधिकारी जोश पामर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  पोलीस सध्या बळी आणि मृतांची नेमकी संख्या निश्चित करण्याचे काम करत आहेत. दरम्यान, स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये इन-एन-आउट बर्गरच्या बाहेर एक तरुण लांब बंदूक हातात घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. तसेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अन्य व्हिडिओमध्ये डझनहून अधिक नागरिक जीव वाचवण्यासाठी रेस्टॉरंटमधून पळून जात असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.