मोदी-शहा राजीनामा द्या! उद्धव ठाकरे यांची खणखणीत भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काठीला खिळे लावून आणि छऱ्यांच्या बंदुकीने अमानुष हल्ला करण्यात आला. पुरुष पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले. जबडे फाडले. ही वेळ विद्यार्थ्यांवर मोदी-शहांनी आणली. त्यामुळे या मुलांना माफ करण्याची गरज नसून त्यांचीच माफी मागण्याची गरज आहे, असा घणाघात करतानाच या प्रकाराबद्दल मोदी, शहा राजीनामा द्या, अशी खणखणीत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.

शिवसेना भवनमध्ये जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंदोलक विद्यार्थ्यांना माफ करण्याआधी ‘नीट’ पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या ते विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोदींनी माफी मागितली पाहिजे. आंदोलकांवर अश्रूधुराचा मारा करण्यात आला. बोलायलाही लाज वाटते अशा पद्धतीने पोलिसांकडून मारण्यात आले.  त्यामुळे आता ही भाषा अयोग्य की ती भाषा अयोग्य असे म्हणण्यापेक्षा या भाषेची सुरुवात कुणी केली ते पहा. या भाषेची सुरुवात करणाऱ्या ‘नमो रुग्णां’चा हा दोष असल्याचा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला. ही भाषा, ट्रोलिंग गेल्या काही वर्षांपासूनच सुरू आहे. मुंबईत प्रिया अहीर नावाच्या मुलीने आंदोलक विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी अडवली म्हणून तिलाही ट्रोल करण्यात आले. त्या भाषेबद्दल कुणी कुणाला माफ करायचे, असा सवालही त्यांनी केला. देशात काय चालले आहे याची माहिती मोदींनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडून घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘धनुष्यबाण’ चिन्ह आपल्याला मिळेल किंवा गोठवले जाईल!

न्यायालयाचा अंतिम निकाल आपल्याच बाजूने लागेल आणि पक्षाचे मूळ चिन्ह आपल्याला परत मिळेल आणि तसे झाले नाही तर ते चिन्ह कायमचे गोठवले जाईल; पण ते त्यांच्याकडे जाणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्यातील वारे सध्या आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे ‘मिशन 2029’च्या तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

ही मुलं तुम्हाला कधी माफ करणार नाहीत!

मुलांना आधी झुरळ आणि आता भरकटलेली म्हणता. ही मुलं तुम्हाला कधी माफ करतील का? आम्ही तिकडे गेलो तेव्हा हल्ल्यामुळे कुणाचा हात तर कुणाचा पाय प्रॅक्चर झाला होता. जबडे फाडले गेले होते. त्यांची साधी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेची मागणी होती. जे तुम्ही आता करताय ते पहिल्या दिवशी बोलून करू शकला असता. तुम्हाला अतिरेक्यांशी बोलायला वेळ आहे. आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलायला का नाही, असा सवालही त्यांनी केला. लोकमान्य टिळक असंतोषाचे जनक होते. मात्र मोदी आणि शहा स्वतःच्याच सरकारविरोधातील असंतोषाचे जनक आहेत, असेही ते म्हणाले. यांनी स्वतःविरुद्ध असंतोष निर्माण केला, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही भाषा अयोग्य की ती भाषा अयोग्य असे म्हणण्यापेक्षा या भाषेची सुरुवात कुणी केली ते पहा. या भाषेची सुरुवात करणाऱ्या ‘नमोरुग्णां’चा हा दोष आहे.