
>> अक्षय मोटेगावकर
[email protected]
मनाच्या तळात लपलेल्या आठवणींचे संदूक उघडणारा दास्तागों नीलेश मिश्रा यांच्या यूटय़ूब चॅनेलवरील ‘स्लो इंटरह्यू’ या मुलाखती म्हणजे शांत, निवांत गप्पा ऐकाव्या अशाच…
संगीतकार विशाल भारद्वाज, चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता, सुधीर मिश्रा, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, तिग्मांशू धुलिया, अभिनेता मनोज वाजपेयी, आदिल हुसैन, पंकज त्रिपाठी, नवाजउद्दीन सिद्दीकी, परेश रावल, संजय मिश्रा, पियुष मिश्रा, आयुषमान खुराणा, अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी, पटकथा लेखक सलीम खान, लेखक अमीश त्रिपाठी, प्रख्यात शेफ रणवीर ब्रार, कुणाल कपूर, गायिका मालिनी अवस्थी, कविता सेठ, कवी, गीतकार डा. कुमार विश्वास, लेखक मानव कौल ही यादीच किती ‘हेवी वेट’ आहे ना! ही मंडळी खऱया अर्थाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील धुरंधर व्यक्तिमत्त्वं आहेत. यांच्या सोबतच्या निवांत मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या तर? त्यांच्या आठवणींचे संदूक उघडायला मिळाले तर? सोनेपे सुहागा. नाही का? ऐकावे जनांचेच्या या प्रवासात असाच एक अनमोल हिरा सापडला तो म्हणजे कवी, गीतकार, पत्रकार, रेडिओ जाकी, यूटय़ूबर आणि मुख्य म्हणजे आताच्या काळातला एक सशक्त दास्तागों नीलेश मिश्रा. नीलेश यांना त्यांच्या कश्मीर आणि नक्षलवादी एरियातील पत्रकारितेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका एक्सलंस अॅवार्ड पण मिळाला आहे. याच नीलेश मिश्रांचे यूटय़ूब चॅनेल पाहिले, ऐकले अन् एखाद्या संथ वाहणाऱया नदीचा पत्ता सापडल्याचा आनंद झाला.
आदिल हुसेन हा माझा आवडता कलाकार. ‘पार्च्ड’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘हॉटेल सालवेशन’, ‘सार्जंट’, ‘गुड न्यूज’ इत्यादी चित्रपटांतून सशक्त भूमिका साकारलेला, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी असलेला आणि अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता. त्याची मुलाखत याआधी फारशी कुठे ऐकण्यात आली नव्हती. आसामच्या छोटय़ाशा गावातून हा माणूस चित्रपटसृष्टीचा प्रवास, आईचा मिळालेला आधार, चित्रपटसृष्टीतील संघर्ष, शेक्सपिअरचे नाटक करणे, जेंबे वाजवणे, स्वतबद्दलचा न्यूनगंड काढण्यासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींवर तो बोलला आहे. अगदी शांत आणि निवांत. नीलेश या गप्पांमध्ये कुठेही घाईगडबड करत नाहीत. नितांत सुंदर असा आहे हा एपिसोड. अगदी एखाद्या पावसाळातल्या दुपारी लॉन्ग ड्राईव्हवर जात असताना ऐकावं असा आहे.
विशाल भारद्वाज यांची मुलाखत म्हणजे एका संवेदनशील माणसाचा, कलाकाराचा, गायकाचा, संगीतकाराचा प्रवास गुलाबाच्या पाकळ्या उलगडाव्यात तसा उलगडला आहे. संगीताची ओढ, गायन, रेखा भारद्वाजवरील प्रेम, लग्न, सांगीतिक जडणघडण आणि संघर्ष, गुलजारजींसोबतचे नाते, दिग्दर्शक म्हणून प्रवास, शेक्सपिअरच्या अजरामर नाटकांचा प्रभाव या सगळ्यातून त्यांच्यातील संवेदनशील कलाकार उठून दिसतो.
नीलेश मिश्रा या मुलाखतींना स्लो इंटरव्यू असंच म्हणतात. त्यामागचा विचारच असा की, आपण पुन्हा पूर्वीसारखे शांत आणि समृद्ध जीवन जगले पाहिजे. त्याकरिता त्यांनी स्लो मूव्हमेंट नावाचा ब्रँड सुरू केला आहे. जितके शांतपणे आपण आपले जीवन जगू तितके ते जगणे अर्थपूर्ण होईल आणि जगण्याचा खरा आनंद आपल्याला लुटता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. हा विचारच किती सुंदर आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्यासोबतचा पॉडकास्ट ऐकवा असाच. राजकारण आणि अभिनय याची सांगड घालता येणे कठीण वाटल्यामुळे पुन्हा अभिनयाकडे वळण्यातील प्रवास, अभिनेते, खेळाडू यांनी शीतपेये, तंबाखूजन्य पदार्थ याची जाहिरात करण्याबाबत असलेला तीव्र आक्षेप हे त्यांच्या बोलण्यातून समजते.
तरुणाईचे लाडके लेखक आणि परराष्ट्रीय सनदी अधिकारी अमीश त्रिपाठी यांचा एका बँकरपासून ते प्रथितयश लेखक हा प्रवास ऐकताना आपण आश्चर्यचकित होतो. अमीशजींच्या नास्तिकापासून ते आस्तिक होण्यापर्यंतच्या प्रवासाचे आपण साक्षीदार होतो. अप्रतिम झाला आहे हा भाग. खरे तर सगळेच भाग छान आहेत. लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्यापैकी कोणतेही पॉडकास्ट ऐकावे आणि त्यात गुंग होऊन जावे असेच आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना कधी कधी नॉस्टॅल्जियामध्ये रमायला आवडते त्यांनी ‘यादोंका इडियट बॉक्स’ ही सीरिज जरूर ऐकावी.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)


























































