वाढवण बंदर भरावासाठी गारगाव, खानिवडे डोंगराच्या चिंधड्या उडवणार, तीन दगड खाण प्रकल्पांवर आज जनसुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढवण बंदर प्रकल्पासाठी समुद्रात भराव करण्याकरिता गारगाव आणि खानिवडे येथील डोंगर फोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी या दोन्ही ठिकाणी तीन दगड खाण प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) उद्या सार्वजनिक जनसुनावणी आयोजित केली आहे. मात्र वाढवण बंदर प्रकल्पाबाबत जिल्ह्यात आधीपासूनच असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर डोंगर फोडून मोठ्या प्रमाणावर दगडांचे उत्खनन करण्याच्या प्रस्तावामुळे भूमिपुत्रांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

एमपीसीबीचे सदस्य सचिव राहुल रेखावार (आयएएस) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) हे या तिन्ही दगड खाण प्रकल्पांचे प्रस्तावक आहेत. बोईसर पूर्वेकडील गारगाव येथील २४.९४ हेक्टर व १७.०८ हेक्टर तसेच खानिवडे येथील १५.३९ हेक्टर क्षेत्रात दगड खाणी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या तिन्ही खाणींमधून दरवर्षी एक कोटीहून अधिक टन दगडांचे उत्खनन करण्यात येणार असून त्याचा वापर वाढवण बंदराच्या समुद्रातील भरावासाठी केला जाणार आहे. जनसुनावणीसाठी पालघर जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष असणार आहेत. एमपीसीबी ठाण्याचे प्रादेशिक अधिकारी सदस्य तर एमपीसीबी तारापूर-२ चे उपप्रादेशिक अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. शिगाव (खुटाड) येथील जीवन शिक्षण संस्थेच्या शाळेच्या मैदानावर २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पहिल्या गारगाव प्रकल्पाची, दुपारी १.३० वाजता दुसऱ्या गारगाव प्रकल्पाची आणि सायंकाळी ४.३० वाजता खानिवडे प्रकल्पाची जनसुनावणी होणार आहे.

डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यास पर्यावरणीय समतोल, भूजल पातळी, धूळप्रदूषण, अवजड वाहनांची रहदारी, शेती आणि स्थानिक जनजीवनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात जिल्ह्यात यापूर्वीही अनेक आंदोलने, मोर्चे आणि ग्रामसभांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता बंदरासाठी डोंगर फोडून दगड काढण्याचा प्रस्ताव समोर आल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज होणाऱ्या जनसुनावणीकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले असून नागरिकांची भूमिका आणि प्रशासनाचा प्रतिसाद यावर या प्रकल्पांच्या पुढील प्रक्रियेची दिशा अवलंबून राहणार आहे.