CWG 2026 – हिंदुस्थानच्या सुवर्णकन्या! अरुंधती, साक्षी अन् प्रियाचा बॉक्सिंगमध्ये ‘गोल्डन पंच’, प्रतिस्पर्ध्यांच्या नांग्या ठेचल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लासगो येथे सुरू असलेल्या Commonwealth Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला बॉक्सर्सनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदकांची बरसात केली आहे. महिलांच्या 51 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने यजमान इंग्लंडच्या रूबी व्हाईटचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सोनेरी यश मिळवले, ज्यामुळे तिच्या भिवानी येथील घरी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा झाला. दुसरीकडे, 70 किलो वजनी गटात अरुंधती चौधरीने इंग्लंडच्या चँटेल रीडला 5-0 असं नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या सुवर्ण घोडदौडीला पुढे नेताना, महिलांच्या 60 किलो लाईटवेट वजनी गटात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या प्रिया घांघसने कॅनडाच्या मारी-बाथौल अल-अहमदियाविरुद्ध अत्यंत चुरशीच्या आणि रणनीतिक सामन्यात 4-1 अशा चमकदार विजय मिळवला. प्रियाची चुलत बहीण नीतू घांघस हिनेदेखील 2022 च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

CWG 2026 – बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानने खातं उघडलं; प्रीती पवार आणि जस्मिन लंबोरियाचा सुवर्ण पंच

साक्षी, अरुंधती आणि प्रिया यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानचा पूर्णपणे डंका वाजला आहे. या तिघींव्यतिरिक्त जॅस्मिन लॅंबोरिया आणि प्रीती पवार यांनीही सुवर्णपदके पटकावली, तर जादुमणी सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. हिंदुस्थानी महिला बॉक्सर्सनी रिंगणात दाखवलेला संयम, आक्रमकता आणि कौशल्याच्या बळावर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडा जगतातून या सुवर्णकन्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.