राज्यात पुढील पाच दिवस कोसळधार! हवामान विभागाकडून घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात पावसाचे धुमशान सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस कोसळणार असल्याचे भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

  • 1 ऑगस्ट 2026 रोजी पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट परिसर, तसेच विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
  • 2 ऑगस्ट 2026 रोजी रायगड, पुणे, सातारा घाट परिसर तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
  • 3 ऑगस्ट 2026 रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसरासह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
  • 4 ऑगस्ट 2026 रोजी विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  • 5 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.