
समता पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले. या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याला राहाता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने आता तपासाला वेग येणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे खाती उघडून तब्बल ६० कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा उलगडा करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात ठामपणे मांडले.
राहाता पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून ६० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या खात्यांचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने झाला, या प्रकारामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत.
सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील अॅड. व्यंकटेश खिस्ते यांनी बचावाची बाजू मांडताना, आरोपीने कोणत्याही कागदपत्रांचा वापर करून कर्ज घेतलेले नाही, खातेदारांनी तक्रार केलेली नाही, असा दावा करत फिर्यादीत अशोक खरातला आरोपी क्रमांक एक करण्यात आल्याबद्दलही आक्षेप घेतला.
सरकारी पक्षाने बचाव पक्षाचे दावे फेटाळून लावत, हा प्रकार केवळ कागदोपत्री त्रुटींचा नसून, नियोजनबद्ध आर्थिक फसवणुकीचा असल्याचे दिसून येत असल्याचा दावा केला. बनावट कागदपत्रांचा वापर करून खाती उघडण्यात आली असून, त्याद्वारे व्यवहार केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने खाते उघडण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित केला. त्यावर सरकारी वकिलांनी, व्यवस्थापकालाही आरोपी करण्यात आले आहे, असे स्पष्ट केले. मात्र, तपास सुरू असून, आरोपी खरातच्या चौकशीतून इतर सहभागी व्यक्ती, व्यवहारांची साखळी आणि कागदपत्रांचा उलगडा होण्यासाठी १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राहाता न्यायालयाने अशोक खरात याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे पुढील सात दिवस शिर्डी पोलीस ठाण्यात त्याची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीतून कोट्यवधी रुपयांच्या संशयित व्यवहारांचे धागेदोरे, बनावट खाती उघडण्यामागील सूत्रधार आणि इतर व्यक्तींबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.























































