
शहरातील नारपोली गंगाराम वाडी परिसरातील तेरा वर्षे जुनी कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत गुरुवारी रात्री कोसळून दहाजणांचा बळी गेला. या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने केलेल्या तक्रारीनंतर इमारतीचा मालक बिलाल अबुबकर खान व कंत्राटदार अशोक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारपोली गंगाराम वाडी परिसरात दुर्घटनाग्रस्त झालेल्या कोहिनूर इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र कंत्राटदाराने कोणतीही काळजी न घेता मनमानीपणे दुरुस्ती करताना इमारतीचे पिलर आणि बीमला धक्का पोहोचवला. त्यामुळे ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यामध्ये १३ जण गाडले गेले. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान यावरून टीकेची झोड उठल्यानंतर पालिकेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी इमारतीचा मालक बिलाल अबुबकर खान व कंत्राटदार अशोक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुरुस्तीची परवानगी नव्हती
कोहिनूर इमारत बांधताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यातच निकृष्ट बांधकाम केल्याने तेरा वर्षांतच ही इमारत कोसळली. धक्कादायक म्हणजे जीर्ण झालेल्या या इमारतीची दुरुस्ती करतानादेखील मालकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
महापौरांनी घेतला आढावा
कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेला खडबडून जाग आली. महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन धोकादायक इमारतींची माहिती घेतली. शहरात अतिधोकादायक २३८ इमारती आहेत तर दुरुस्ती करता येतील अशा ८३६ धोकादायक इमारती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता या सर्व इमारतींचा वीज व पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.























































