
मनोरंजन विश्वात कधी काय घडेल आणि कोणता नवीन ट्विस्ट येईल याचा नेम उरलेला नाही. सध्या भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील एका भलत्याच चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या उत्तम अभिनयाने आणि नृत्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. पण सध्या तिच्या लग्नापेक्षाही जास्त चर्चा रंगतेय ती तिच्या एका धक्कादायक निर्णयाची. भोजपुरीतील एका बड्या अभिनेत्यासोबत तिचे नाव नेहमीच जोडले गेले असून त्यांच्या अफेअरच्या चर्चाही तुफान रंगल्या होत्या. अशातच आता या अभिनेत्रीने लग्न न करताच मला आई व्हायचंय अशी थेट इच्छा व्यक्त करून सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. बोहल्याव न चढताच आई होण्याचा इतका मोठा निर्णय घेणारी ही ग्लॅमरस अभिनेत्री दुसरी कोणी नसून आम्रपाली दुबे आहे.
झाले असे की, आगामी भोजपुरी बवाल या रिॲलिटी शोचा एक नवा प्रोमो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये 39 वर्षीय आम्रपाली दुबे तिचा कथित बॉयफ्रेंड व प्रसिद्ध अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आणि तिच्या कुटुंबासमोर मनातील ही मोठी गोष्ट सांगताना दिसत आहे.
मी माझ्या आयुष्यातील कदाचित सर्वात मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयाचा परिणाम काय होईल, माझे कुटुंब किंवा माझे चाहते कसे रिॲक्ट करतील मला कल्पना नाही; पण मला हे करायचे आहे. मला आई व्हायचे आहे! असे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर निरहुआ आणि कुटुंबीयांसमोर बसून आम्रपाली म्हटते.
आम्रपालीचे हे विधान ऐकताच तिचे वडील आणि घरातील इतर सदस्य काही क्षणांसाठी पूर्णपणे सुन्न झाले. यावर निरहुआने तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हटले की, एका मुलाला एकटीने लहानाचे मोठे करणे इतके सोपे नाही. यावर डोळ्यांत पाणी आणून आम्रपाली म्हणाली, हो, मुलाला एकटीने सांभाळणे सोपे नाही. पण माझ्या घरच्यांचे एकच चालले असते… लग्न, लग्न, लग्न! त्यावर निरहुआने तिला थेट प्रश्न विचारला, मग तू लग्न का करत नाहीस? निरहुआचा हा प्रश्न ऐकून आम्रपाली अवाक होती. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान, आम्रपालीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही लोकांच्या मते ती बिनलग्नाची सरोगसी किंवा दत्तकविधानाद्वारे आई बनण्याचा निर्णय घेऊ शकते, तर काहींच्या मते हा केवळ शोच्या प्रसिद्धीचा एक भाग असू शकतो. आम्रपालीचा हा बहुचर्चित रिॲलिटी शो ‘भोजपुरी बवाल’ जिओहॉटस्टारवर 2 ऑगस्ट 2026पासून सुरू होत आहे. या शोमध्ये निरहुआ, पवन सिंह आणि काजल राघवानी यांसारखे भोजपुरीतील दिग्गज कलाकार एकत्र धमाल करताना दिसणार आहेत.

























































