
जंतर मंतरवरील पराभवानंतर मोदी व त्यांचे सरकार हलले आहे. मोदींभोवती अभेद्य कवचकुंडले आहेत हा भ्रम तुटला आहे. उलट मोदी यांची त्यांच्याच पक्षातील लोकांकडून घेराबंदी सुरू असल्याचा संशय वाढला आहे. गृहमंत्री अमित शहांना 2029 च्या आधी पंतप्रधान व्हायचेच आहे. शिंद्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केले, ते अमित शहा मोदींबाबत करणार काय?
‘जंतर मंतर’वरील झुरळांचे आंदोलन तूर्तास संपले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रधान संसदेच्या मकर दारातून बाहेर पडले तेव्हा भाजपमधील त्यांच्या समर्थकांनी त्यांचा संसदेच्या पायरीवर सत्कार केला. हा बेशरमपणाचा कळस आहे. जणू प्रधान हे फार मोठे शौर्य गाजवूनच बाहेर पडत होते. राजकारणात सध्या सर्वत्र चारित्र्याचा दुष्काळ पडला आहे. त्याचे प्रात्यक्षिक लोकशाही मंदिराच्या पायरीवर दिसले. पावसामुळे दुष्काळ पडतो तेव्हा लोक वरुणराजाची प्रार्थना करतात, पण भारतीय राजकारणातील चारित्र्याचा दुष्काळ संपावा म्हणून कोणाची प्रार्थना करणार? चारित्र्य हा आता सद्गुण राहिलेला नाही. चारित्र्य म्हणजे नैतिक शक्ती आहे यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही. कवी टेनिस म्हणतो, “माझे अंत:करण चारित्र्याच्या योगाने शुद्ध असल्यामुळे माझ्या अंगात दहा हत्तींचे बळ नांदत आहे.” सध्या चारित्र्यामुळे निर्माण होणारे बळ उरले नसल्याने सत्ता, संपत्ती, कपट यातून बळ निर्माण केले जाते. त्याचा वापर करून आंदोलन करणाऱ्या मुलामुलींना मारले जाते. त्याच बळाचा वापर करून राजकीय पक्ष फोडले जात आहेत. पुन्हा हे सर्व करून, घडवून देशाचे गृहमंत्री अमित शहा नामानिराळे राहिले. दिल्लीत विरोधी पक्षाने त्यांचा राजीनामा मागायला हवा. ‘जंतर मंतर’ आंदोलनात पंतप्रधान मोदी बदनाम झाले. प्रधान घरी गेले. एरवी ऊठसूट कोणत्याही विषयावर बोलणारे व गुरगुरणारे गृहमंत्री शहा या प्रकरणात रहस्यमयरीत्या गप्प राहिले. त्यामागच्या रहस्यावर सध्या दिल्लीत चर्चा सुरू आहे.
पक्षातच कारस्थाने
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षात व सरकारमध्ये कारस्थाने सुरू आहेत काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मोदी हे याक्षणी हतबल आहेत. गृहखात्याच्या ताब्यात सर्व यंत्रणा आहेत. त्याची सूत्रे अमित शहांकडे आहेत. `जंतर मंतर’चे आंदोलन चिघळत गेले. ते वेळीच थांबवता आले असते. 370 कलम हटवल्यावर ज्या शहांनी कश्मीरमधील परिस्थिती हाताळली (असा त्यांचा दावा आहे) ते ‘जंतर मंतर’च्या रस्त्यावरील मुलांचे आंदोलन हाताळू शकले नाहीत हे कोणालाच पटणार नाही. सोनम वांगचुक उपोषणाला बसणार आहेत व ते प्रदीर्घ काळ उपवास करतील याची पूर्ण कल्पना गृहमंत्र्यांना असायलाच हवी होती. वांगचुक यांच्या ‘जंतर मंतर’वरील उपस्थितीने आंदोलनाला नैतिक बळ मिळेल, प्रकरण हाताबाहेर जाऊ शकेल याची कल्पना गृहमंत्र्यांनी केली नसेल तर ते राजकीयदृष्ट्या कच्चे आहेत व त्यांनी त्या पदावर राहू नये. संसदेवर मोर्चा निघाला तेव्हा शांतता होती. मोर्चा संसदेवर धडकला तेव्हा मोर्चेकऱ्यांशी संवाद साधायला हरकत नव्हती. उलट लाठीमार, अश्रुधूर, खिळ्यांच्या काठ्यांनी मारहाण, छऱ्यांच्या बंदुकांचा वापर करून तरुणांच्या असंतोषाला जाणीवपूर्वक खतपाणी घालण्याचे काम पद्धतशीर झाले. तरुणाई पंतप्रधान मोदींचे वस्त्रहरण करत होती व अमित शहा ‘शकुनी’प्रमाणे हे वस्त्रहरण पाहत होते. मुलांमध्ये जास्त स्फोटक वातावरण तयार होईल अशा पद्धतीनेच त्यांची पावले पडली व शेवटी प्रधान यांचा राजीनामा घेण्याइतपत वातावरण टोकाला नेले. अमित शहांना ही परिस्थिती एकतर हाताळता आलेली नाही किंवा त्यांनी हे `अराजक’ वाढेल अशीच पावले टाकली. असे का? भविष्यात मोदी यांची जागा घेऊ शकतील अशा प्रत्येक शक्तीचा या आंदोलनातून काटा काढण्याची संधी गृहमंत्र्यांनी घेतली. स्वत: मोदी यांना बदनाम केले ते वेगळेच.
हे असेच घडेल
मोदी सरकारमध्ये मतभेद वाढले आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाचा अखेरचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे 2029 च्या आधी भाजपमध्ये अनेकांच्या पंतप्रधानपदाच्या आकांक्षा जागा झाल्या आहेत. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या बातम्या अशा –
पंतप्रधान मोदी यांनी आपणास उपपंतप्रधान म्हणून घोषित करावे. त्यामुळे मोदींचा वारस आपणच असू अशी भूमिका अमित शहांनी तयार केली आहे. मोदी यांना ही भूमिका मान्य नाही.
अमित शहा यांनी स्वत:चा गट व स्वत:चे खासदार उभे करायला सुरुवात केली आहे. प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, भाजपचे कवळे कवळे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे अमित शहा गटाचे आहेत. योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना जमेल तसे अडचणीत आणणे व बदनाम करणे यासाठी शहा यांच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा राबत आहे. शहांच्या वाटचालीतला सर्वात मोठा अडथळा महाराष्ट्रातले नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे वाटत असल्याने शहांची यंत्रणा त्यांच्या विरोधात सूत्रे हलवू लागली आहे.
अमित शहा यांनी पक्षफोडीचा उपक्रम सुरूच ठेवला आहे. तृणमूल काँग्रेस व शिवसेनेचे खासदार त्यांनी भाजपमध्ये सामील करून घेतले नाहीत. तर त्यांचा स्वतंत्र गट निर्माण केला.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे खासदार फोडून ते शिंदे गटात सामील करण्याची त्यांची योजना आहे. (ही ‘मोहीम’ सध्या नरेंद्र मोदी यांनी थांबवली आहे.)
मोदी हे जगाला नकोसे झाले होतेच, पण ‘जेन झी’च्या यशस्वी आंदोलनामुळे मोदी यांची उरलीसुरली पत घसरली. मोदी हे नेते राहिले नाहीत. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन सत्तेवर आलेले ते हुकूमशहा आहेत. यावर आता जागतिक मंचावर एकमत झाले. जागतिक शक्तींकडून मोदींचे पतन करण्यात गृहखात्यातील मोठ्या यंत्रणेचा वापर करण्यात आला.
नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी घेण्याबाबत सुचवले. सध्या दिल्लीत मला तुमची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल असे आश्वासन दिले. भाजपमधील संभाव्य बंडाळीत देवेंद्र यांनी आपल्या बाजूने उभे राहावे अशा पद्धतीने मोदी रचना करत आहेत.
मोदी यांच्या पक्षाचे संपूर्ण बहुमत लोकसभेत नाही. बहुमताचा फुगवलेला आकडा अमित शहांनी विकत घेतला आहे ही मोदींसाठी चिंतेची बाब आहे.
मोदी हे दिल्लीच्या राजकारणात सर्व घडामोडीत व कारस्थानांत अमित शहांवर अवलंबून राहिले. त्याची प्रचीती मोदी यांना येत आहे.
अमित शहा हे मोदींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते हे खरेच आहे, पण महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या की, निष्ठा सहज वाहून जातात. मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात शिंदे यांनी जे केले, ते पंतप्रधानपदासाठी अमित शहा मोदींबाबत करण्याची दाट शक्यता आहे. मोदी यांची मानसिकता ही ‘मीच भाजपचा शेवटचा पंतप्रधान आणि यापुढे गुजरातचा कोणताही नेता माझ्यापुढे जाणार नाही’ या पद्धतीची आहे. शहा यांच्या मनात त्यामुळे अस्वस्थता आहे.
दिल्लीचे पुढचे राजकारण यापुढे याच आठ सूत्रांभोवती फिरत राहील.
राज्यात काय?
या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काय होईल, याकडे काळजीपूर्वक पाहावे लागेल. महाराष्ट्रात सरकार आपसातील साठमारीमध्ये पूर्ण अडकले आहे. “आम्ही दोघे मित्र आहोत. आमच्यात फूट पडणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत शिंद्यांकडे बघत बोलतात. हा जबरदस्तीचा मामला असल्याचे दोन्ही बाजूचे महत्त्वाचे लोक सांगतात. दिल्लीत मोदी व शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात त्या दोघांचे स्वतंत्र गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. सत्ता सूत्राने त्यांना एकत्र बांधून ठेवले आहे इतकेच. बाकी त्यांच्यातली ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मतलबापुरती आहे. दिल्ली व महाराष्ट्राच्या दोन्ही गटांत इमोशन संपली आहे. ‘जंतर मंतर’वरील विद्यार्थ्यांना ज्या निर्घृण पद्धतीने मारले तेथेच इमोशनचा अंत झाला.
आता दिल्लीत आणि महाराष्ट्रात यापुढचे चित्र दोन गटांतील लढाईचेच असेल.
नरेंद्र मोदी यांची घेराबंदी त्यांच्याच पक्षात झाली आहे.
ब्रुटस्च्या हाती कमळ आहे. उद्या तलवार येईल व जवळचेच लोक घात करतील!
मोदी स्वत:हून जातील, की त्यांच्याच पक्षातील ब्रुटस् त्यांना घालवतील, इतकेच आता पाहायचे.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]




























































