
बेकायदा बॅनर्स, पोस्टर्समुळे होणारे अपघात आणि शहराचे विद्रूपीकरण टाळण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली असून तब्बल 1 हजार 95 जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. शिवाय 62 जणांवर विविध पोलीस ठाण्यांत एफआयआरदेखील दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत पालिकेने 1 लाख 22 हजार 897 पोस्टर्स हटवलेही आहेत.
मुंबईत अनेक कार्यक्रम, राजकीय आणि शुभेच्छा देणारे फलक, बॅनर्स मोठय़ा प्रमाणात लावण्यात येत असल्याने पालिकेकडून नियमितपणे फलक हटवणे आणि कारवाईची प्रक्रिया केली जाते. फलकांमुळे शहराच्या होणाऱ्या विद्रुपीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही पालिकेला आदेश दिले आहेत. यानुसार ही कारवाई सुरू आहे. यामध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये सर्वाधिक 20,599 अनधिकृत फलक व साहित्य हटविण्यात आले, तर 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यात 6,145 हटविण्याची कारवाई झाली. विशेष म्हणजे, जून 2026 मध्ये 54 खटले दाखल करण्यात आले, तर एप्रिल आणि मे 2026 मध्ये एकही खटला दाखल झालेला नसल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सांगण्यात आले.
अशी झाली कारवाई…
2025 या वर्षात 99,015 अनधिकृत बॅनर, बोर्ड, पोस्टर्स, झेंडे आणि भिंतीवरील विद्रूपीकरण हटविण्यात आले. त्यामध्ये 64,807 बॅनर्स, 22,335 बोर्ड, 5,531 पोस्टर्स, 5,797 झेंडे आणि 545 भिंतीवरील विद्रूपीकरणाची प्रकरणे होती. या कालावधीत 769 कारवाया, 912 पोलीस तक्रारी आणि 60 एफआयआर दाखल करण्यात आले.
तर जानेवारी ते जून 2026 या सहा महिन्यांत आणखी 23,882 अनधिकृत साहित्य हटविण्यात आले. त्यामध्ये 16,834 बॅनर्स, 4,892 बोर्ड, 1,357 पोस्टर्स, 795 झेंडे आणि 4 भिंतीवरील विद्रूपीकरणाची प्रकरणे होती. या कालावधीत 107 कारवाया, 183 पोलिस तक्रारी, 2 एफआयआर नोंदविण्यात आले.































































