
>> दिव्या सौदागर
[email protected]
वैवाहिक नातसंबंधातील तणावांमध्ये जोडप्यांना वैयक्तिक विचारधारणांतून व नकारात्मक भावनांतून बाहेर काएकमेकांबद्दलचा विश्वास परत आणून देणे गरजेचे असते. नात्याची वीण तरच टिकून राहते.
राजेश हा चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला होता. उत्तम पगार, सतत मिळत जाणारी बढती आणि तिघांचे- तो, त्याची पत्नी आणि मुलगी असे त्याचे कुटुंब, पण हल्ली राजेशचं बिनसत चाललं होतं. तो आणि त्याच्या पत्नीमध्ये रेखा (नाव बदलले आहे) दुरावा वाढत चालला होता. शेवटी रोजच्या कटकटींना वैतागून त्यांनी समुपदेशनाचा मार्ग पत्करला होता. दोघांच्या भांडणाचं कारण तसं गंभीर होतं. रेखाचे मधल्या काळात विवाहबाह्य संबंध होते आणि अर्थातच ही गोष्ट राजेशला हादरवून गेली होती.
‘‘मी तिला माफ केलं मॅम आणि या गोष्टीला आता वर्षही होऊन गेलंय. मी त्या कटू आठवणी मागेही ठेवल्या होत्या, पण रेखाने त्या दिवशी भांडणात मला सांगून टाकलं की, मी तिला समजून घेतलं नाही म्हणून तिने दुसरा पर्याय शोधला.’’ राजेश त्याची बाजू मांडत होता आणि रेखा खाली मान घालून अपराध्यासारखी बसली होती. राजेशला तिला तसं बघून अधिकच चेव चढला आणि त्याने पुढे सांगायला सुरुवात केली.
“मी फक्त आणि फक्त रेखा व मुलीचा विचार केला…’’ तेवढय़ात “माझा? खरंच?’’ रेखाने पहिल्यांदाच बोलायला सुरुवात केली. “म्हणजे तुला म्हणायचं काय आहे?’’ राजेश चिडला. त्यावर रेखानेही सुरुवात केली. “तुला फक्त माझा सगळीकडे अपमान करायचा होता. माझी कशी खिल्ली उडवता येईल हाच तुझा प्रयत्न असायचा. आता मी पण नोकरी करते, पण माझी नोकरी असणं हाही तुझ्यासाठी इगो इशू झालेला आहे. तू ऑफिसमधून येतोस तेव्हा तुला ब्रेक हवा असतो. साधा चहासुद्धा तू करत नाहीस. त्याहीसाठी माझी वाट पाहतोस. मदत कर म्हटलं की, नोकरी सोड, ऑफिसमधल्या अडचणी सांगितल्या की, झेपत नसेल तर सोड हे उत्तर. आमच्या दोघींबरोबर राहायला तुला वेळ नसतो, पण मित्रांबरोबर असतो. दर सुट्टीच्या दिवशी तू पिकनिकला. मी कोणाशी शेअर करू स्वतला? मी म्हणूनच पर्याय माझा माझा शोधला.’’ असं म्हणून रेखा तोंड लपवून रडायला लागली.
रेखा आणि राजेशचा प्रेमविवाह होता. त्यात रेखा दिसायला राजेशपेक्षा बरीच उजवी होती. साहजिकच राजेशला त्याच्या नातेवाईकांकडून, मित्रपरिवाराकडून तिच्या दिसण्याबद्दल कौतुक ऐकायला मिळे आणि त्याच्याबद्दल छुपी असूया. या सगळ्याचा राजेशवर उलटा परिणाम व्हायला लागला. तिचं कौतुक हळूहळू त्याच्या मत्सरात बदललं गेलं. “त्या वेळी माझी नुकतीच नोकरी गेलेली. मी घरीच असायचे आणि हा अनअव्हेलेबल होता. घरी उशिरा यायचा आणि लगेच जेवून झोपायचा.’’ त्या वेळी रेखाला मध्येच तोडत राजेश म्हणाला, “माझं प्रमोशन डय़ू होतं आणि मी त्या स्ट्रेसमध्ये होतो.’’ “मी पण वेगळ्या स्ट्रेसमध्ये होते राजेश. करीअर की मुलीचा सांभाळ या द्वंद्वामध्ये मी अडकले होते. त्यात आपले इथे नातेवाईकही जवळपास नाहीत. त्यामुळे एकटेपण अजून वाढायला लागलं. मला मॉरल सपोर्ट हवा होता… तुझा. तो नव्हता. मग एका भावनिक क्षणी मी चुकीच्या मार्गाला गेले,’’ रेखा म्हणाली.
हल्ली राजेशकडून तिला तिच्या मते आधीसारखे प्रेम किंवा आपुलकी अनुभवायला येत नव्हती. जरी त्याने तिला माफ केलं होतं, पण त्याच्याकडून सतत तिला तिच्याबद्दल हेटाळणी आणि टोमणे ऐकायला मिळू लागले होते. ज्यामुळे त्यांच्या कामजीवनावरही परिणाम झाला. हीच तक्रार राजेशचीही तिच्याबद्दल होती. एकूणच गैरसमज आणि परस्परांबद्दलचा अविश्वास यामुळे त्यांचं नातं हे तुटण्याच्या मार्गावर होतं. वास्तविक पाहता रेखापेक्षा राजेशकडे लक्ष देण्याची गरज होती. कारण रेखाने तिच्या हातून घडून गेलेल्या चुकीचं समर्थन न करता पुढे जाण्याची आणि मार्ग शोधायची तयारी दाखवली होती. मात्र राजेश अजूनही ती गोष्ट विसरला नव्हता, ज्यामुळे त्याला मनस्ताप, चिंता, निद्रानाश, संशय अशा समस्यांनी ग्रासायला सुरुवात केली होती.
वैवाहिक समुपदेशनात बऱयाचदा जोडप्यांमध्ये येणाऱया नैतिक समस्यांचा तोडगा काळजीपूर्वक आणि हळुवार सोडवावा लागतो. कारण त्या व्यक्तींची वैयक्तिक विचारधारणेची (बिलीफ सिस्टिम) बैठक तयार झालेली असते. राजेशची विचारधारा ही ठाम होती. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्त्वही तसंच घडलेलं होतं. मुलगा म्हणून त्याला बरंच लाडावलेलं होतं. सगळं त्याच्या हातात मिळत होतं आणि तीच त्याची अपेक्षा रेखाकडून राहिली. या उलट रेखाकडे उलट परिस्थिती होती. तिच्या आई-वडिलांनी तिला लहानपणापासून स्वतची जबाबदारी घ्यायला शिकवलं. त्यामुळे रेखाच्या जोडीदाराबद्दलच्या कल्पना या समानतेच्या होत्या. तिला अपेक्षाभंगाचं दुःख तेव्हा झालं जेव्हा तिला कळलं की, राजेश हा पुरुषसत्ताक प्रवृत्तीचा आहे.
आता आव्हान होतं ते म्हणजे राजेश आणि रेखाचा संसार पुन्हा सुरळीत सुरू करण्यासाठी दोघांनाही वैयक्तिक विचारधारणांतून तसंच नकारात्मक भावनांतून बाहेर काढून एकमेकांबद्दलचा विश्वास परत आणून देणं. त्यासाठी त्यांची वैयक्तिक सत्रे सुरू झाली. राजेशला बसलेला धक्का जरी स्वाभाविक असला तरी त्याच्या ‘तिने का केलं?’ यावर उत्तर शोधण्यापेक्षा झाल्या गोष्टीला फक्त कटू आठवण म्हणून स्वीकारणं त्याच्या हातात आहे आणि हेच त्याच्या मनःशांतीसाठी फायदेशीर आहे हे पटवण्यात आलं. रेखालाही अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर काढण्यात येत होतं. तिला राजेशच्या सकारात्मक बाजू समजायला लागल्या.
राजेशही हळूहळू रेखामधले सकारात्मक बदल, तिची त्याच्या मनात भरण्यासाठी चालली धडपड आणि संसार वाचवण्याची आस्था टिपत होता. त्यानेही तिला साथ द्यायचं ठरवलं व झालं गेलं गंगेला मिळालं या भावनेतून दोघांनाही नव्या जोमाने परत एकदा संसाराला सुरुवात केली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































