डीलिमिटेशनला पाठिंबा देणारे ‘गद्दार’ ठरतील, राहुल गांधी यांचा तामीळनाडूतून इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ फेररचना विधेयकाला कडाडून विरोध दर्शवताना राहुल गांधी यांनी आज तामीळनाडूतील राजकीय पक्षांना जोरदार इशारा दिला. ‘मतदारसंघ फेररचना ही तामीळनाडूच्या जनतेला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी आणि त्यांची सत्ता हिरावून घेण्यासाठी आखली गेली आहे. हे भाजपचे कारस्थान असून त्याला पाठिंबा देणारे एटप्पन (गद्दार) ठरतील, असे राहुल गांधी म्हणाले.

तामीळनाडूतील काही पक्ष मतदारसंघ फेररचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तामीळनाडूच्या इतिहासात गद्दार म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या एटप्पनचा उल्लेख केला. ‘भाजप देशात मतदारसंघ फेररचना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जे कोणी या प्रयत्नांना पाठिंबा देतील, ते तामीळनाडूशी प्रतारणा करत आहेत. ते तामीळनाडूच्या भविष्याशी गद्दारी करत आहेत आणि भाजपला तामिळी जनता व त्यांच्या भविष्यावर हल्ला करण्याची संधी देत आहेत. असे करणारे 21 व्या शतकातील एटप्पन ठरतील, असे राहुल गांधी म्हणाले.

कोणत्याही तमीळ व्यक्तीने मतदारसंघ पुनर्रचनेचं समर्थन करू नये. प्रत्येक तमीळ व्यक्तीने याला विरोध केला पाहिजे. प्रत्येक तमीळ पक्षाने, प्रत्येक राष्ट्रीय पक्षाने सभागृहात हा प्रस्ताव फेटाळून लावला पाहिजे.’