रंगयात्रा – द लायन हंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< दुष्यंत पाटील
[email protected] [email protected]

आजच्या जमान्यातले श्रीमंत लोक आपली श्रीमंती दाखवायला महागडे कार्स खरेदी करतात. सतराव्या शतकातले श्रीमंत युरोपियन मंडळी वैभव दाखवण्यासाठी आपल्या महालांमध्ये मोठमोठी तैलचित्रं लावायची. प्रसिद्ध चित्रकारांकडून ही चित्रं काढून घेताना त्यांना प्रचंड किंमतही मोजायला लागायची. पण महालांमधली ही पेंटिंग्स लोकांवर नक्कीच छाप टाकायची.
17 व्या शतकात युरोपमध्ये पीटर पॉल रुबेन्स नावाचा एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिभावंत चित्रकार होऊन गेला. युरोपमधले मोठमोठे ड्युक्स, राजे, राण्या आणि श्रीमंत व्यापारी त्याच्याकडून भव्य आकाराची चित्रं बनवून घ्यायचे. रुबेन्सचं चित्र राजवाड्यात असणं म्हणजे श्रीमंतीचा आणि सत्तेचा एक पुरावाच मानला जायचा! रुबेन्स फक्त चित्रकारच नव्हता, तर अनेक युरोपीयन राजांसाठी ‘राजदूत’ म्हणूनही काम करायचा. त्याच्याकडे अँटवर्क नावाच्या शहरात एक मोठा स्टुडिओ होता. या स्टुडिओमध्ये अनेक सहाय्यक त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे. थोडक्यात सांगायचं तर, 17 व्या शतकातल्या श्रीमंतांच्या दिखाव्याची गरज ओळखून रुबेन्सनं स्वतचं एक मोठं ‘आर्ट एम्पायर’ उभं केलं होतं!

बव्हेरियाचा ड्यूक मॅक्सिमिलियन हा त्या काळातला एक अतिशय शक्तिशाली शासक होता. मॅक्सिमिलियनला आपल्या आप्तेष्टांवर, तसंच सरदारांवर आपल्या वैभवाची, सामर्थ्याची छाप पाडायची होती. त्याला त्याच्या राजवाडय़ातल्या भिंतींवर असं काहीतरी हवं होतं की, ज्याच्यामुळे त्याची शक्ती, धाडस आणि प्रदेशावरचं नियंत्रण दुनियेला दिसेल. त्या काळात शासकाची सत्ता आणि पौरुषत्व दाखवायला शिकारीची दृश्यं असणारी चित्रं वापरली जायची. त्यामुळे मॅक्सिमिलियननं रुबेन्सला शिकारीचीच चित्रं काढायला सांगितलं. मग रुबेन्सनं शिकारीच्या चित्रांची एक मालिकाच काढली. यात सिंह, वाघ, लांडगे आणि रानडुक्कर यांच्या शिकारीची दृश्यं होती. या चित्रमालिकेत सर्वात जास्त गाजलं ते सिंहाच्या शिकारीचं चित्र.
हे चित्र बनवण्यासाठी रुबेन्सनं स्वतः अनेक दिवस मेहनत घेतली आणि स्वतःच मुख्य भागांवर काम केलं. असं म्हटलं जातं की, रुबेन्सनं जेव्हा हे चित्र काढायला सुरुवात केली, तेव्हा त्यानं युरोपमधल्या एका राजाच्या मालकीचा असणारा सिंह पाहिला होता. पण तो प्राणी पिंजऱ्यात शांत होता. म्हणून रुबेन्सनं जिवंत सिंहाची आक्रमकता दाखवायला जुन्या क्लासिकल शिल्पकलेचा आणि स्वतच्या कल्पनाशक्तीचा वापर केला!

या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे चित्र पाहताना आपल्याला जाणवणारी त्यातली गतिमानता. खरं तर चित्रातलं दृश्य आपण चित्र पाहताना स्थिर असतं. पण तरीही हे चित्र पाहताना त्यातली गतिमानता आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाही. एखाद्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात काहीतरी हाणामारीचं दृश्य चालू असताना आपण अचानक व्हिडीओ पॉज केला तर कसं चित्र दिसेल? चित्र पॉज केलेलं असलं तरी त्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांची देहबोली आपल्याला पुढच्या क्षणी काय होणार आहे, ते थेटच सांगतात. या चित्रातही असाच एक क्षण पकडलाय. शिकार चालू असताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करून तो व्हिडीओ पाहताना अचानक पॉज केल्यावर काय दिसेल तेच या चित्रात दाखवलंय.

चित्राच्या अगदी मध्यभागी एक शक्तिशाली, हल्ला करणारा सिंह आहे. पांढरी वस्त्रं धारण केलेल्या सैनिकावर त्यानं हल्ला केलाय. पण याच सिंहावर इतर सैनिक हल्ला करताना दिसताहेत. यातले दोन सैनिक भाल्यांनी, तर एक सैनिक तलवारीनं हल्ला करतोय. सिंहाच्या चेहऱ्यावर उग्र भाव दिसतात. त्यानं पांढरं वस्त्रं परिधान केलेल्या सैनिकाला घोड्यावरून खाली पाडलंय. हा पडणारा सैनिक भाल्यानं सिंहाला मारण्याचा प्रयत्न करतोय.

या सिंहाच्या पुढच्या बाजूला अजून एक शिकारी जमिनीवर पडलाय. त्याच्या हातात चाकू दिसतोय. तर चित्रात डाव्या बाजूला अजून एका सिंहावर दोन सैनिक हल्ला करताना दिसताहेत.

हे चित्र बरोक शैलीमध्ये काढलंय. इतिहासातला सर्वसाधारण 1600 ते 1750 हा कालखंड बरोक कालखंड म्हणून ओळखला जातो. या कालखंडातली चित्रशैली म्हणजे बरोक शैली. चित्रामधली गतिमानता, डायगॉनल रचना आणि प्रकाश, अंधार यांच्यामुळे येणारा उठाव ही या शैलीची तीन वैशिष्ट्यं होती. रुबेन्सच्या या चित्रात ही तिन्ही वैशिष्ट्यं ठळकपणे जाणवतात.
वरवर पाहता हे नुसतं सैनिकांनी केलेल्या शिकारीचं चित्र आहे. पण या शिकारीच्या थरारात रुबेन्सनं अस्पष्टता ठेवलीये. या चित्राकडे पाहताना पुढे काय होणार ते स्पष्टपणे सुचवलेलं नाही. म्हणजे सिंहाचा मृत्यू होणार की सिंह सुटून जाणार, पांढऱ्या वस्त्रांचा माणूस वाचणार की नाही हे अनिश्चितच आहे. त्यामुळेच हे चित्र थरारक बनतं. जसं एखाद्या एकतर्फी क्रिकेट मॅचमध्ये थरार उरत नाही, पण शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रन्स हव्या असतील आणि तीनच विकेट्स शिल्लक असतील तर थरार जाणवतो, तसंच चित्रातल्या दृश्यात पुढे काय होणार ते माहीत नसल्यानं या चित्रात थरार जाणवतो.

भीती, धाडस, शक्ती आणि असुरक्षितता या सगळ्या मानवी भावना एकाच कॅनव्हासवर परिणामकारकरीत्या दाखवल्यानं हे चित्र अजरामर झालं.