पनवेलमधील अग्निशमन जवान डेंजर झोनमध्ये, छताचे प्लास्टर कोसळले; महिला कर्मचारी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आग लागली किंवा एखादी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली तर आपल्या जिवाची बाजी लावून नागरिकांचे जीव वाचवणारे पनवेलमधील अग्निशमन जवान सध्या डेंजर झोनमध्ये आहेत. नवीन पनवेल येथील अग्निशमन केंद्राची इमारत धोकादायक बनली असून या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे. ४४ वर्षांपूर्वी सिडकोने बांधलेल्या या इमारतींच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे.

नवीन पनवेल येथील अग्निशमन केंद्राची इमारत १९८४ साली बांधली आहे. आता ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत, स्लॅबमधून पाणी गळते आणि कोणत्याही क्षणी मोठा भाग कोसळण्याची भीती आहे. या अग्निशमन केंद्रात ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. फायरमन, ड्रायव्हर, अधिकारी यांच्यासह संपूर्ण स्टाफ जीव मुठीत घेऊन येथे ड्युटी करत आहे. छताचे प्लास्टर पडल्यामुळे सोनल झेंजे या महिला फायरमन जखमी झाल्या.

अधिकारी फक्त पाहणी करून गेले

अग्निशमन केंद्राचे प्रवेशद्वारही मोडकळीस आले आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाने याबाबत पनवेल महापालिकेच्या बांधकाम विभागाला वारंवार माहिती दिली आहे. अधिकारी पाहणी करून गेले असले तरी अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि अग्निशमन जवानांनी नाराजी व्यक्त केली आहे.