पंधरा वर्षांपासून पडीक असलेल्या प्रकल्पांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अलिबागमध्ये घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बळजबरीने जमिनी संपादित करून त्यावर कोणताही प्रकल्प न उभारणाऱ्या कंपन्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तडाखा दिला. रायगडातील शेतकऱ्यांची भूसंपादनात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे, अशी कबुलीच आज बावनकुळे यांनी दिली. अनेक प्रकल्पांसाठी जिल्ह्यात ५० एकर, १०० एकर किंवा त्याहून अधिक असे ९५० क्लस्टर तयार केले आहेत. मात्र या जागांचा वापर प्रकल्पांसाठी न करता त्या पडीक ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे या जागा सरकार ताब्यात घेईल आणि नंतर त्या शेतकऱ्यांना परत करण्याची कारवाई होईल, असे बावनकुळे यांनी जाहीर केले.

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अलिबागमध्ये आयोजित करण्यात आले होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जागा विकत घेतल्या जात आहेत. विविध प्रकल्प दाखवून शेतकऱ्यांकडून ५० एकर, १०० एकर, २०० एकर अशा जागा एकत्रित संपादित करण्यात येतात. मात्र या जमिनींवर वर्षानुवर्षे प्रकल्प उभे राहिलेले नाहीत. ज्या प्रकल्पांसाठी जागा घेतल्या आणि प्रकल्प उभे राहिले नाहीत त्यांना सहा महिन्यांत प्रकल्प उभारण्याची नोटीस देण्यात येईल. मात्र त्यानंतरही या जागांवर प्रकल्प न उभारल्यास या जागा सरकार ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना परत करेल.