
<<दुर्गेश आखाडे>>
नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून रुजू होऊन काशीनाथ गोताड यांनी जेमतेम ४० दिवस भरले होते. ज्या दिवशी साप चावला त्याच दिवशी गोताड यांच्या बँक खात्यात पहिला पगार जमा झाला, पण कंत्राटी सफाई कामगार काशीनाथ गोताड या जगात नव्हते. रविवारी जवाहर मैदानावर महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील जवाहर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचे सफाई कामगार साफसफाईची कामे करत होते. त्यावेळी साफसफाई करताना गोताड यांना घोणस साप चावला. सहकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान गोताड
यांचा मृत्यू झाला.
याबाबत नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रत्नागिरी नगर परिषद काशीनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना मदत करणार असून पुढील बैठकीत तसा ठराव करण्यात येईल.
कामगारांना साधनसामुग्री मिळते का?
कंत्राटी कामगाराच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सफाई कामगारांना गमबूट किंवा ग्लोव्हज दिले जातात का? साधनसामुग्री दिल्यानंतर काम करताना कामगार गमबूट किंवा ग्लोव्हज वापरतात का? यावर पर्यवेक्षक किंवा निरीक्षक नजर ठेवून असतात का? दुर्घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोण मदत करणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सफाई कामगार जीव धोक्यात घालून काम करतात तेव्हा त्यांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
























































