भाजपच्या 7, एमआयएमच्या 16 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; मनपा आयुक्त घेणार सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसरे अपत्य, बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे अशा कारणांवरून महापालिका प्रशासनाने तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यात सत्ताधारी भाजपच्या सात, तर विरोधी पक्षनेत्यासह एमआयएम पक्षाच्या १६ जणांचा समावेश आहे. यातील अनेकांना दोन, तीन प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (ड) (१) नुसार दोन पेक्षा जास्त अपत्ये असणे, अनधिकृत बांधकाम करणे, तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण करणे, आदी प्रकरणात तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागातून विजयी झालेल्या अनेक नगरसेवकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने नगर सचिव विभाग, जन्म-मृत्यू विभाग, अतिक्रमण विभागाकडून चौकशी करून अहवाल मागविण्यात आला होता.

हा अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने शुक्रवार, ३१ रोजी ३७ नोटिसा बजावल्या आहेत. त्यात २३ नगरसेवकांचा समावेश असून, भाजपचे सात, तर एमआयए पक्षाच्या १६ जणांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेकांना तिसरे अपत्य, बेकायदा बांधकामे अशा दोन प्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

म्हणणे मांडण्याची संधी

नगरसेवकांना दिलेल्या नोटिसीनुसार त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक नगरसेवकाला वेगवेगळी तारीख सुनावणीसाठी देण्यात आलेली आहे. आपले म्हणणे कागदपत्रांसह सादर करावे, म्हणणे सादर केले नाही तर एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

हिवराळे, नावंदर, समीर साजेद यांचा समावेश

प्राप्त झालेल्या नोटिसीनुसार भाजपचे गणेश नावंदर, जीवकपाल हिवराळे, एमआयएम पक्षाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद यांचा समावेश आहे. अब्दुल समीर साजेद यांना दोन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.