
>> रितेश पोपळघट
[email protected]
शेतकरी विविध संशोधन संस्थांचा आणि शासकीय यंत्रणांचा कसा फायदा करून घेऊ शकतात, याचा सखोल विचार व्हायला हवा. या संशोधन संस्था म्हणजे शेतकऱ्यांसाठी पंढरीच. मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांनी शेतीच्या या ‘पंढरी’ला भेट दिली आहे? तेथील विविध विभागांचा अभ्यास केला आहे? संशोधकांशी संवाद साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर फारसे आश्वासक नाही.
पंढरपूरची वारी नुकतीच आषाढी एकादशीला पार पडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन मनोभावे विठुरायाचे दर्शन घेऊन परतले. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी ही केवळ एक यात्रा किंवा प्रवास नसून स्वतच्या मनाचा शोध घेण्याचा आणि विठ्ठलाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा एक आध्यात्मिक प्रवास आहे. या प्रवासातून वारकरी विठुरायाशी आपले नाते जोडतात आणि स्वतच्या तसेच समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा की, जशी प्रत्येक वारकऱ्याची एक पंढरी असते, तशीच शेतीतही प्रत्येक शेतकऱयाची एक ‘पंढरी’ असते. प्रत्येक शेतकऱ्यालाही आपल्या शेतीतील त्या पंढरीचा प्रवास घडावा, त्या प्रवासातून त्याला समाधान, यश आणि समृद्धी मिळावी, हीच अपेक्षा. मध्यंतरी एका आध्यात्मिक संस्थेबद्दल माहिती घेत असताना त्यांचे एक तत्त्व समजले- साधना, सेवा आणि सत्संग हे तीन मार्ग माणसाला जीवनाच्या परमोच्च बिंदूपर्यंत घेऊन जातात. मला वाटते हेच तत्त्व शेतीलाही तितक्याच प्रभावीपणे लागू होते. साधना म्हणजे शेतीतील प्रत्येक काम प्रामाणिकपणे व चिकित्सक वृत्तीने करणे. सेवा म्हणजे आपल्या अनुभवातून जे शिकायला मिळाले, ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि सत्संग म्हणजे नेहमी चांगल्या, प्रगतशील व सकारात्मक विचारांच्या शेतकऱयांच्या सहवासात राहून त्यांच्यातील चांगले गुण आत्मसात करणे. जर प्रत्येक शेतकरी या तीन तत्त्वांचा स्वीकार करू लागला, तर प्रत्येक शेत खऱया अर्थाने पंढरपूर बनेल.
माझ्या मते, कृषी क्षेत्रातील खरी ‘पंढरी’ पाहायची असेल, तर भारतातील विविध कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांना अवश्य भेट दिली पाहिजे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत देशभरात 100 हून अधिक संशोधन संस्था विविध पिके, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि कृषी तंत्रज्ञान विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी महाराष्ट्रात 11 हून अधिक महत्त्वाच्या संस्था कार्यरत असून त्या संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि शेतकऱयांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करतात.
महाराष्ट्रातील प्रमुख भारतीय कृषी अनुसंधान परिषद संस्थांमध्ये केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था मुंबई, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई, केंद्रीय संत्रा संशोधन संस्था नागपूर, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था माळेगाव (बारामती), कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था पुणे, कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे, पुष्पशेती संशोधन संचालनालय पुणे, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांचा समावेश होतो.
यासोबतच महाराष्ट्रात चार प्रमुख कृषी विद्यापीठे आणि त्यांची विभागीय कृषी संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (जि. अहिल्यानगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (जि. रत्नागिरी) यांचा समावेश होतो. ही चारही कृषी विद्यापीठे महाराष्ट्रातील विविध कृषी-हवामान विभागांचे प्रतिनिधित्व करतात. पीक सुधारणा, उद्यानविद्या, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, कृषी अभियांत्रिकी, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्तार या माध्यमांतून ही विद्यापीठे शेतकऱयांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, उत्पादनवाढीच्या शास्त्राrय पद्धती आणि कृषी व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देतात.
या संस्थांव्यतिरिक्त महाराष्ट्रात 50 हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे कार्यरत असून ती जिल्हास्तरावर शेतकऱयांपर्यंत संशोधनाधारित तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या , सहकारी संस्था आणि इतर सामाजिक संस्था कृषी विकास, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान प्रसारामध्ये सक्रिय योगदान देत आहेत. या सर्व संस्थांचे एकत्रित कार्य महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि स्पर्धात्मक बनविण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतकरी म्हणून आपण या संशोधन संस्थांचा आणि शासकीय यंत्रणांचा नेमका कसा फायदा करून घेऊ शकतो, याचा आता सखोल विचार होणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात किती शेतकऱयांनी आपल्या शेतीच्या या ‘पंढरीला’ भेट दिली आहे? तेथील विविध विभागांचा अभ्यास केला आहे? संशोधकांशी संवाद साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर अशा शेतकऱयांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आढळेल.
माझे स्वतचे मागील काही वर्षांतील अनुभव अत्यंत समृद्ध करणारे आहेत. आजपर्यंत मी 10 पेक्षा अधिक संस्थांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेतील विविध विभागांना भेट देण्याची आणि तेथील ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे बारामती कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पद्धतींनी लागवड केलेल्या उसाचे प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळाला. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पाणी व्यवस्थापन व संशोधन विभागाला पूर्वनियोजित वेळ घेऊन भेट दिली असता तेथील संशोधक, व्यवस्थापक आणि विभागप्रमुख यांनी अतिशय सखोल, उपयुक्त व व्यावहारिक माहिती दिली.
माझ्या मते, याबाबतीत आपण शेतकरी म्हणून काही मूलभूत चुका करतो. अशा संस्थांना भेट देण्यापूर्वी संबंधित विभागाशी संपर्क साधून वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. आपण कोणत्या विषयासाठी जात आहोत, कोणत्या तज्ञांना भेटायचे आहे आणि कोणते संशोधन पाहायचे आहे, याची पूर्वतयारी केली पाहिजे. जर आपण थोडा अधिक अभ्यास, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण जिज्ञासा ठेवून या कृषी संशोधन संस्थांशी जोडले गेलो, तर केवळ वरील संस्थाच नव्हे, तर देशभरातील सर्व कृषी संशोधन संस्था आपल्या शेतीच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान देऊ शकतात.
शेतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान, संशोधन आणि नवनवीन तंत्रज्ञान आपल्या देशातील संशोधन संस्थांमध्ये उपलब्ध असताना आपणच त्यांच्यापासून दूर राहिलो, तर त्याचा लाभ आपल्या शेतीपर्यंत कधीच पोहोचणार नाही. त्यामुळे या संस्थांशी जोडले जाणे, त्यांचे संशोधन समजून घेणे आणि ते आपल्या शेतात आत्मसात करणे हीच आधुनिक व यशस्वी शेतीची खरी गुरुकिल्ली आहे.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून
‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)
























































