टिळकांच्या जेजे उड्डाण पूल येथील शिल्पाचा पालिकेला विसर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारी गर्जना करणारे स्वराज्याचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचा मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमधील अधिकाऱ्यांना विसर पडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यतिथीच्या दिवशी जे. जे. उड्डाणपुलाखालील असलेल्या लोकमान्य टिळकांच्या शिल्पस्थळी किमान स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नसल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

 

जे. जे. उड्डाण पुलाखाली लोकमान्य टिळकांचे शिल्प आहे. पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कुलाबा विधानसभाप्रमुख विकास मयेकर, उपविभागप्रमुख बाजीराव मालुसरे आणि उपशाखाप्रमुख रंजिश जाधव शिल्पस्थळी गेले असता बी वॉर्डच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला.

 

लोकमान्य टिळकांचे शिल्प धुळीने माखलेले असून परिसरात गर्दुल्यांचा वावर असल्याचे आढळून आले. महापुरुषांचे स्मारक उभारले की जबाबदारी संपते, अशीच महापालिकेची मानसिकता आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पुण्यतिथीच्या दिवशी किमान स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. हे शिल्प लोखंडी जाळीत बंदिस्त असल्याने टिळकप्रेमींना जाळीलाच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे लागले.