
पेरूमधील प्रसिद्ध ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या नाझका लाइन्स परिसरात शनिवारी एक पर्यटकांचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील 11 विदेशी पर्यटकांसह 2 वैमानिक अशा एकूण 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे.
नाझका प्रशासनाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, हे विमान पर्यटकांना नाझका लाइन्सची हवाई सफर घडवून आणत होते. एरोडियाना या पेरुव्हियन विमान वाहतूक कंपनीचे असून हे विमान असून ते सेस्ना ग्रँड कॅरॅव्हन प्रकारचे होते. विमानाने जवळच असलेल्या इका शहरातून उड्डाण केले होते.
उड्डाण पूर्ण करून विमान नाझका विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना अचानक त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते शेतात जाऊन कोसळले. अपघाताच्या एक दिवस आधी या परिसरात मोठे वाळूचे वादळ आले होते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर पेरूच्या प्रशासनाने अपघाताच्या कारणांची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. अपघाताबाबत ‘एरोडियाना’ कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
मृतांमध्ये 11 परदेशी नागरिकांचा समावेश
पेरूच्या व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये 11 परदेशी नागरिक आणि 2 क्रू मेंबर्स आहेत. मृतांमध्ये इटलीचे 7 नागरीक, जर्मनीचे 2 नागरीक आणि स्पेनचे दोन नागरीक आहेत, अशी माहिती ‘एजन्शिया अंदिना’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेली आहे.
नाझका लाइन्स नक्की काय आहे?
नाझका लाइन्स हे पेरूतील अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. शेकडो वर्षांपूर्वी पेरूच्या मूळ रहिवाशांनी वाळवंटातील जमिनीवर कोरलेली ही भव्य आणि अफाट भूमितीय आकृत्याआहेत. यामध्ये विविध प्राण्यांची चित्रे कोरलेली असून ती पूर्णपणे पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी विमान किंवा मोठ्या टॉवरचा वापर करावा लागतो. एरोडियाना ही कंपनी गेल्या 14 वर्षांपासून पर्यटकांना या स्थळाची हवाई सफर घडवून आणत आहे.























































