Yavatmal news – संत शहापुरी महाराज मठातील दानपेटी फोडली; चोरीची घटना CCTV मध्ये कैद, भाविकांमध्ये तीव्र संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झटाळा–तरोडा फाटा परिसरातील श्री संत शहापुरी महाराज मठातील दानपेटी फोडून अज्ञातांनी रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार मठातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळी मठाचे दरवाजे उघडल्यानंतर दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. पेटीतील सर्व रोकड गायब झाल्याचे लक्षात येताच मठाच्या व्यवस्थापनाने तातडीने पारवा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला.

मठातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात एक चोरटा चोरी करताना दिसून येत आहे. या फुटेजच्या मदतीने पोलीस आता संशयिताचा माग काढत आहेत. पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोराला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

सराफा दुकानांपाठोपाठ आता मठातही घरफोडी

गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लाखो रुपयांचा ऐवज असणाऱ्या सराफा दुकानांना चोरांनी लक्ष्य केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. त्यातच आता धार्मिक स्थळांमधील दानपेट्यांवरही दरोडे पडू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि मुख्य तसेच संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था कडक करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. तसेच सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोराला लवकरात लवकर अटक करावी, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.