नरेंद्र मोदी फेसबुक पंतप्रधान, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोरोना काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असल्याबद्दल टीका करणारे नरेंद्र मोदी आता स्वत: फेसबुकवरच जनतेशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधताये ना, फेसबुकवरून काम करतायेत ना? हे सुद्धा फेसबुक पंतप्रधान आहेत, अशी सणसणीत टीका संजय राऊत यांनी केला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा लोकसभेत बोलताना दिसत नाही हा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, कोरोना संकटकाळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेला मार्गदर्शन करत असताना याच मंडळींनी त्यांना ‘फेसबुक नेता’ असे हिणवले होते, याची आठवण करून दिली. कोरोना काळात प्रत्यक्ष बाहेर पडण्यावर खरंतर मोदींनीच बंदी घातली होती.  उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पळून गेले ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस होते. मग आता गेले काही दिवस नरेंद्र मोदी आहेत कुठे? फेसबुकवरच जनतेशी बोलतायेत आणि काम करतायेत ना? विद्यार्थ्यांशी संवाद साधतायेत हे सुद्धा ‘फेसबुक पंतप्रधान’ आहेत अशी संतप्त टीका संजय राऊत यांनी केली.

फडणवीसांना केंद्रातली जबाबदारी स्वीकारण्याची मोदींकडून सूचना

केंद्रातील राजकीय उलथापालथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या नाचक्कीला केंद्रीय शिक्षण खातेच जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले. गेल्या बारा वर्षांत प्रथमच मोदींना एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला असून, तो शिक्षणमंत्र्याचाच होता, असे संजय राऊत म्हणाले. देशातील विद्यार्थी आणि तरुणांनी जंतरमंतरसह संपूर्ण देशात रस्त्यावर उतरून शिक्षण खात्याच्या कारभाराविरोधात ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत आंदोलन केले. शिक्षण खाते हे देशासाठी भक्कम पिढी घडवणारे आणि कोटी तरुणांच्या भविष्याशी निगडित महत्त्वाचे खाते आहे, जिथे वाळवी लागल्यामुळे मोदींना अखेर माघार घ्यावी लागली आणि तरुणांनी त्यांचा पराभव केला, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात या खात्यासाठी एखादा दूरदृष्टी असलेला, उच्चशिक्षित आणि चांगला प्रशासक नेता नेमण्याचा विचार असून, देशात उत्तम शिक्षणमंत्री होण्यास देवेंद्र फडणवीस पात्र आहेत हे मोदींनाही ठाऊक आहे . पुढे ते म्हणाले, दिल्लीतील मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, केंद्रातील अत्यंत महत्त्वाच्या पहिल्या पाच खात्यांपैकी एक असलेल्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाची (MHRD) जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना त्यांना केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय आणि ज्याच्यात नेतृत्व क्षमता नाही, अशा व्यक्तीला शोधून पदावर बसवतात

भाजप पक्षातील सध्याच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करताना संजय राऊत म्हणाले की, पक्षात सध्या दिल्लीतूनच राज्य चालवण्याची परंपरा आहे. गुजरातचे एकदाच आमदार राहिलेले आणि शेवटच्या बाकावर बसणाऱ्या गृहस्थाला मुख्यमंत्री केले गेले. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत, जो कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय आणि ज्याच्यात नेतृत्व क्षमता नाही, अशा व्यक्तीला शोधून भाजप पदावर बसवत असते, असा टोला त्यांनी संजय राऊत यांनी लगावला. मात्र, या प्रकरणात मोदींनी फडणवीसांना तुमच्या पसंतीचाच मुख्यमंत्री नेमला जावा, असे आश्वासन दिल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. या देशाला एक उत्तम शिक्षणमंत्री मिळावा, अशी आमची आणि बहुतांश सरकारचीही इच्छा असून, आता यावर देवेंद्र फडणवीस काय विचार करतात, हा त्यांचा निर्णय असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.