
हिंदुस्थानने जिम्नॅस्टिक्समध्ये सोनेरी इतिहास रचला आहे. अरिहा पंगंबमने एरोबिक्स आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक जिंकले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ महिलांच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानी जिम्नॅस्ट ठरली आहे. अरिहाने अंतिम फेरीत १९.१०० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि या स्पर्धेत हिंदुस्थानसाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. मणिपूरच्या अरिहा पंगंबमने ‘आर्टिस्ट्री’ या प्रकारासाठी ८.६५०, ‘एक्झिक्युशन’साठी ७.६०० आणि ‘डिफिकल्टी’साठी २.८५० गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. २०२६ आशियाई एरोबिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप ४ ते ७ ऑगस्टदरम्यान फिलीपिन्समध्ये आयोजित करण्यात आली होती. हिंदुस्थानी जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष सुधीर मित्तल म्हणाले, ‘हे आमच्यासाठी एक मोठे यश आहे, कारण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. अरिहाने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तिचे आणि तिच्या प्रशिक्षक-पालकांचे अभिनंदन.’

























































