
मुंबईतील एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याचे नाव व फोटो वापरून तोतया व्यक्तीने फसवणूक केली. आरोपीच्या सांगण्याला बळी पडत तब्बल १ कोटी ९८ लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ही रक्कम जाण्यापासून वेळीच रोखली.
सायबर भामट्याने शक्कल लढवत एका खासगी कंपनीच्या संचालकाचे नाव व फोटो एका व्हॉट्सअॅप क्रमांकावर ठेवून हा माझा नवीन नंबर आहे असे त्याच कंपनीच्या जनरल मॅनेजरला सांगून तत्काळ एका बँक खात्यावर एक कोटी ९३ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मॅनेजरने संबंधित रक्कम त्या खात्यावर पाठवली. त्यानंतर पैसे पाठविल्याचा संदेश मॅनेजरने संचालकांच्या मूळ क्रमांकावर पाठवला. तेव्हा आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक
घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला एमएचबी पोलिसांनी अटक केली. कलमजित कुलजित सिंग ऊर्फ सनी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ४४ लाख १२ हजार रुपयांचे दागिने, रोख रक्कम ७० हजार, मोबाईल फोन आणि मनगटी घड्याळ असा ४५ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. त्याच्या अटकेने एमएचबी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हयांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोकलमध्ये जागेच्या वादातून महिलेला मारहाण करणारा ताब्यात
लोकलमध्ये जागेच्या वादातून महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची दखल अंधेरी रेल्वे पोलिसांनी घेतली. मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले. लोकलमध्ये एक जण महिला प्रवाशाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्या डब्यात बसणाऱ्या एकाही प्रवाशाने तो मारहाणीचा व्हिडीओ अपलोड केला.
एका युझरने एक्सवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्टला गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमध्ये ही घटना घडली. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गोवंडी येथे राहणारा मोहम्मद रिझवान अन्सारी हा डब्यात चढला. त्या डब्यातून एक महिला प्रवास करत होती. तेव्हा अन्सारीचे सीटवर बसण्याच्या वादातून महिलेसोबत भांडण झाले. त्याने महिलेचा विनयभंग करून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

























































