वेब न्यूज – मंगळावर प्राचीन जीवनाचा नवा धागा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन 

अमेरिकेच्या नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावर मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसणारी बहुभुज रचना शोधून काढली आहे. ‘व्हॅले ग्रांदे’ (Valle Grande) परिसरात आढळलेल्या या रचनांमुळे अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर पाणी अस्तित्वात होते का? या प्रश्नाला नवे बळ मिळाले आहे. संशोधकांच्या मते, आतापर्यंत मंगळावर अशा प्रकारच्या लहान रचना दिसल्या होत्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळलेले हे पहिलेच क्षेत्र आहे. या बहुभुज भेगा ओलसर माती वारंवार भिजणे आणि कोरडी पडणे या नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. पृथ्वीवरही तलाव किंवा चिखल कोरडा पडल्यावर अशाच प्रकारचे नमुने तयार होतात. त्यामुळे मंगळावर कधीकाळी पाण्याचे साठे, ओलसर वातावरण किंवा जीवनास पोषक परिस्थिती असण्याची शक्यता अधिक बळकट होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. 2012 पासून कार्यरत असलेल्या क्युरिऑसिटी रोव्हरने यापूर्वीही मंगळावर सेंद्रिय रेणू, गंधकाचे स्फटिक आणि प्राचीन जलप्रवाहांचे पुरावे शोधले आहेत. या नव्या शोधामुळे मंगळाच्या भूवैज्ञानिक इतिहासाचा आणखी सखोल अभ्यास करण्यास मदत होणार आहे. या रचनांचे रासायनिक आणि खनिज विश्लेषण करून त्या नेमक्या कोणत्या काळात तयार झाल्या आणि त्यांचा पाण्याशी किती जवळचा संबंध होता, याचा शोध आता संशोधक घेणार आहेत. मंगळावर प्रत्यक्ष जीवनाचे पुरावे अद्याप सापडलेले नसले तरी अशा प्रत्येक शोधामुळे लाल ग्रहावरील प्राचीन वातावरणाचे गूढ उलगडण्यास मदत होत आहे. दरम्यान, या भागातील खडकांचे उच्च-रिझोल्युशन छायाचित्रण आणि नमुन्यांचे विश्लेषण सुरू असून भविष्यातील संशोधनातून या बहुभुज रचनांची निर्मिती नेमकी कोणत्या भूवैज्ञानिक प्रक्रियेतून झाली, याचे अधिक स्पष्ट उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मंगळावरील प्राचीन पर्यावरण समजून घेण्यासाठी या शोधाकडे वैज्ञानिक आशेने पाहत आहेत.