Ahilyanagar News – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैगिंक अत्याचार, मुकादमाच्या मुलावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील एका गावातील साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी ऊसतोडी कागार पुरविणाऱ्या मुकादमाच्या मुलाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून ते हंगामी कामासाठी बाहेरगावी जात असतात. ऊसतोडीसाठी कामगार पुरविणाऱ्या मुकादमाच्या मुलाची पीडितेशी ओळख झाली होती. मार्च 2026 मध्ये आरोपीने पीडित मुलीला घरातून जबरदस्तीने घेऊन जाऊन एका ठिकाणी ठेवले. तेथे तसेच त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पीडित मुलीने एका अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून आईशी संपर्क साधून आपण न्हावरा येथे असल्याची माहिती दिली. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी तिचे आई-वडील तेथे जाऊन तिला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी आरोपी धनंजय आठरे याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.