
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) मुख्य प्रवेशद्वारावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रवेशकमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना आज अचानक कमान कोसळली. या दुर्घटनेत सात मजूर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. सिमेंट व खडीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अकिबुल शेख, अनिसरहमान मलिक, अरविंद कुमार, शाहिद शेख, कादर शेख, मीनारुल शेख आणि सियाराम चौधरी (सर्व रा. पश्चिम बंगाल) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. सर्व जखमींवर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिरज सिव्हिल रुग्णालयाचे कुंपण व प्रवेशद्वार कमानीचे काम खासगी ठेकेदारामार्फत सुरू आहे. आज दुपारी सुमारे 25 फूट उंच व 30 फूट लांब कमानीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी सुमारे 25 मजूर कामावर होते. स्लॅबवर पाच, तर त्याखाली काही मजूर काम करत असतानाच अचानक स्लॅब कोसळला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ रुग्ण, नातेवाईक व नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने दुर्घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली मजूर अडकल्याचे लक्षात येताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
बांधकाम सुरू असलेली भलीमोठी कमान काही मिनिटांतच जमीनदोस्त झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ढिगारा हटवून अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी क्रेन व दोन जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर पोलीस प्रशासन, नागरिक, आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने सातही मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.
दोषींवर कारवाई करणार – तुषार दोशी
मिरज सिव्हिलमधील घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.
निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मोहन वनखंडे आणि वैद्यकीय मदत सेलचे शहराध्यक्ष श्रीधर लवटे यांनी केली आहे. मिरज सिव्हिल रुग्णालयातील बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याची तक्रार आठवड्यापूर्वी कामगार आयुक्ताकडे केली होती. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर आज प्रवेशकमानीचा स्लॅब कोसळून सात मजूर जखमी झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

























































